त्याच खड्‌डयात वृक्षारोपणाचा घाट

येरवडा – राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेला वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम हा फक्‍त फोटो शूटपुरता मर्यादित राहिला आहे. कागदोपत्री वृक्षलागवडीचे रोपण करून त्यातून अधिकारी सहीसलामत बाहेर पडत आहेत. दरवर्षीच्या या उपक्रमात कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. असाच प्रकार येरवडा येथील गोल्फ चौक ते जेल रोड पोस्ट ऑफिस येथे शनिवारी (दि.12) लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या साक्षीने घडत आहे. दोन वर्षांपूर्वी या मार्गावर वृक्षारोपण केले होते. त्याच खड्ड्यात पुन्हा विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धनाचा शासनाकडून उपक्रम राबविला जात आहे. 4 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असताना अधिकारी मात्र, सोपास्कार पार पाडत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. शहरात अनेक ठिकाणी हा उपक्रम फोटो शूटपुरता मर्यादित राहिला आहे. शनिवारी (दि. 12) पालिकेच्या वृक्ष प्राधिकारणाच्या वतीने वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम गोल्फ चौक येथे होणार आहे. दोन वर्षांपूर्वी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला होता.

काही शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने येथे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली होती. मात्र, झाडे लावल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी न घेतली जात नाही.

शनिवारी गोल्फ चौकात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. जवळपास 50 झाडे लावण्यात येणार आहेत. उद्यान विभागाचा कार्यभार एका वर्षांपूर्वी माझ्याकडे आला आहे. त्यामुळे यापूर्वी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला की नाही, याची माहिती मला नाही.
– शशिकांत बांबळे, सहायक उद्यान अधीक्षक उद्यान विभाग


वृक्ष प्राधिकरणमार्फत लावण्यात येणारी झाडांची 100 टक्‍के निगा राखण्यात येणार आहे. ही झाडे जगविण्याचा आणि संगोपन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. शाळा, महाविद्यालयांनीही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यावेत. मात्र, लावलेल्या झाडांची काळजीही घ्यावी.
– अरविंद गोरे, प्राधिकरण समिती सदस्य

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)