वनस्पती: खरबूज-टरबूज

उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते म्हणूनच भरपूर पाणी व क्षार देणारी खरबूज व टरबूज अशी फळे, देणारे वृक्ष ही देखील वनौषधीच ठरते. इतर पोषणमूल्ये असणारी जलप्रमाण अधिक असलेली ही फळे होत. निसर्गाने ती आपल्यासाठीच निर्माण केली आहेत.

बाहेरचे वातावरण तापले की घामावाटे माणसाच्या शरिरातील पाणी व क्षार बाहेर टाकले जात असल्याने त्याची कमतरता भरून काढावी लागते त्यासाठी खरबूज हे फळ निर्माण केले आहे. नदीच्या वाळवंटात येणारे हे फळ. सुंदर पिवळसर केशरी रंगाचे, विशिष्ट स्वाद असलेले आणि ओलसर गराचे असते. उन्हाळ्यात ते आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण राखते. कलिंगड व खरबूज ही फळे उन्हाचा दाह कमी करतात. खरबूज कलिंगडापेक्षा आकाराने लहान असले तरी पोषकतेच्या दृष्टिने श्रेष्ठ असते. दोन्ही फळांमध्ये 95 टक्‍के पाणी असते.

औषधी उपयोग : प्रथिने व कर्बोदके अल्प प्रमाणात असल्याने 100 ग्रॅम फळांमधून फक्‍त दहा कॅलरीज उपलब्ध होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थूल व्यकिंतनाही दोन्ही फळे म्हणजे वरदानच आहेत. मधुमेहींनाही या फळांचा आस्वाद मनमुराद घेता येतो.

खरबुजात जीवनसत्व क आणि बीटा कॅरोटीन या जीवनसत्वांचे प्रमाण चांगले असते. तसेच थोड्या प्रमाणात कॅलशियम व फॉस्फरस ही खनिजेही असतात. उन्हाळ्यात शरीराला ज्याची खूप गरज असते ते सोडियम क्‍लोराईड, पोटॅशियम, मॅगेनिझ, कॉपर व सल्फर हे क्षार व खनिजेही खरबुजात भरपूर असतात.

खरबुजाला “कस्तुरी फळ’ असेही म्हणतात. खरबुजाला कस्तुरीसारखा वास असतो. आईस्क्रीम, मिल्क शेक व फ्रूट सॅलेडमध्ये खरबूज घातल्यास त्या पदार्थांना चांगला स्वाद येतो. खरबुजाच्या बियाही पोषक असतात. भोजनानंतर तुरट, गोड, किंचित आंबटसर अशा रसांचा समुच्चय असलेला या फळांचा तुकडा तोंडात सावकाश चघळत ठेवल्यास भरपूर लाळ सुटते. त्यामुळे पचनास मदत होते.

मुखशुद्धी : खरबूज, बडीशेप, तीळ, लाल भोपळा अशा सर्व बियांची मिळून मुखशुद्धी करता येते ती अशी…
बडीशेप – पाव किलो, धन्याची डाळ, तीळ, खरबूज बिया, लाल भोपळा बिया प्रत्येकी 100 ग्रॅम, 3-4 लिंबाचा रस, मीठ एक चमचा, हळद एक चमचा.

लिंबाचा रस, मीठ व हळद एकत्र करून वरील प्रत्येक पदार्थाला स्वतंत्रपणे हाताने चोळून लावावे व उन्हात वाळवावे. प्रत्येक जिन्नस वेगवेगळ्या कढईत थोडेसे भाजून नंतर एकत्र मिसळावे. ही मुखशुध्दी अन्नपचनाला फार चांगली आहे. तसेच खरबुज टरबुज यांच्या रसांची भावना जिरे बडीशेप यांना देतात.

कळवळा (व्हेलेरियन) व्हेलेरियाना ऑफिसिनॅलिस

कुल : व्हेरियॅनेसीई
भारतीय नावे :
मराठी – कळवळा
हिंदी – बिल्लीलोटन, बदरंगबोया, जलाकन भारताच्या डोंगराळ भागात कळवळा आढळतो.
1 मीटर उंच, बहुवर्षीय औषधी, मूलस्तंभ खोडापेक्षा जाड व त्यापासून भूस्तरी निघतात, खोड खाचा असलेले, खालच्या भागात केसाळ, वर गुळगुळीत, खालच्या पानांची पर्णवृंत्ते लांब, वरची लहान, फुले पांढरी किंवा मळकट पांढरी, लहान शाखांच्या टोकावर, लहान गुच्छांमध्ये, फळ लहान गुळगुळीत, केसविरहित.

उपयुक्‍तता : या झाडाची मूलस्तंभे व मूळेच औषधी आहेत. ही हिवाळ्यात वाळवतात. हळूहळू वाळवल्याने त्यापासून चांगले औषध मिळते. कळवळा मध्य मज्जासंस्था मंद करते हिस्टेरियल फिटस, मज्जासंस्थेचे इतर विकार आणि पोट फुगवल्यावर वापरले जाते. मूलस्तंभाचा आणि मुळांचा ताजा रस मादक (गुंगी आणणारा) आहे म्हणून निद्रानाशामध्ये आणि हृदयरोगाच्या इतर औषधात वापरले जाते.

इतर जाती अशा- या प्रजातीच्या इतर जाती व्हॅलेरियाना वॅलिची हिमालयात काश्‍मीरपासून आसामपर्यंत मोठ्या प्रमाणावर सापडते आणि याचे गुणधर्म व्हॅलेरियाना ऑफिसिनॅलिस सारखेच असतात.

फांगळा – फांगळ्याचे मूळ संस्कृत नाव फणिज्जक आहे. फांगळ्याचे झाड हे लहान असते. रानतुळशीप्रमाणे दिसते. त्याची पानेही रानतुळशीप्रमाणेच असतात. फक्‍त पानांना कतऱ्या नसतात. फांगळ्याला तुरे येतात. एकूण झाडाचा आणि तुऱ्याचाही रंग लालसर असतो. फांगळ्याच्या तीन जाती आहेत. पांढरा, लाल आणि काळा.

फांगळा हे लघु कडू, रुक्ष, हृद्य, अग्निदीपक, पित्तल (पाककाळी), तुरट (रसकाळी), तिखट, रूचकर, तीक्ष्ण, कफकारी, वातकारी, उष्ण असते. फांगळा हे अर्श कृष्ठ, सर्प आणि विंचवाच्या विषाच्या नाश करते. फुरश्‍यांच्या विषावर देखील फांगळ्याचे पाळ किंवा घोट वेलीचे पाळ उगाळून तीस ग्रॅम पोटात द्यावे म्हणजे विषबाधा होणार नाही.

डोके जड झाले असता काळ्या कुडाचे पाळ उगाळून डोक्‍याला लावावे. पोटात दु:खत असेल तर उगाळलेली पाळ पोटात घ्यावी. तोंडाला चव नाही आणि उलटी होत असेल असे वाटत असेल तर फांगळ्याच्या कोवळ्या तुऱ्या आणि तीन चार मिरं एकत्र वाटून गोळी करावी आणि खावी.

शरीरास सूज आली असता फांगळ्याचा उपयोग होतो. कृमी झाले असता ओला पाला हातावर चुरून जखमेवर पिळावा. ताबडतोब किडे मरतात. मूत्राघातावर फांगळ्याच्या पाल्याचा रस अतिशय गुणकारी आहे. मात्र त्याचा डोस वैद्याच्या सल्ल्याने घ्यावा. पोटात जंत झाले असता फांगळ्याच्या पानांचा रस काढून दिला जातो. अशा प्रकारे फांगळा हा अतिशय उपयोगी आहे.

जनावरांच्या जखमांवरसुद्धा फांगळ्याच्या पाल्याचा रस गुणकारी आहे. जर का वाताने अंग ठणकत असेल तर संबंध शरीराला फांगळ्याच्या पाल्याचा लेप लावावा. म्हणजे अंगदुखी थांबून आराम मिळतो. शरीरावरील सूज कमी होण्यास तसेच रक्‍तदाबावरही फांगळ्याबाबत संशोधन चालू आहे.
अशाप्रकारे फांगळा ही एक वनौषधी आहे.

– सुजाता गानू

Leave A Reply

Your email address will not be published.