मुंबई शेअरबाजारातील स्मॉल कॅपिटल कंपन्यांचा निर्देशांक वर्षभरात 34 टक्क्यांनी वाढला तर मिड साईज कॅपिटल वर्गातील कंपन्यांचा निर्देशांक याच कालावधीत 21 टक्क्यांनी वाढला. सध्या शेअरबाजार आतापर्यंतच्या सगळ्यात सर्वोच्च पातळीवर असल्याने स्वाभाविकपणे म्युच्युअल फंडांच्या योजनाही चमक दाखवू लागल्या आहेत. 2017 या आर्थिक वर्षानंतर प्रथमच शेअरबाजारात अधिक व्यापक तेजी आल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दीर्घ कालावधीनंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅप वर्गातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसू लागली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या ज्या गुंतवणूकदारांनी संयम आणि शिस्त पाळली. त्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य फुलले आहे. मिडकॅपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांनी वर्षभरात सरासरी 24 टक्के परतावा दिलेला आहे. स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांमध्ये वार्षिक 30 टक्क्यांपर्यंत परतावा मिळालेला आहे.
आयटी आणि फार्मा सेक्टरपाठोपाठ मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी चांगली कामगिरी केलेली आहे. वर्षभरात मुंबई शेअरबाजारातील स्मॉलकॅम निर्देशांक 34 टक्क्यांनी वधारला तर मिडकॅप निर्देशांक वर्षभरात 21 टक्क्यांनी वधारला. म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे गुंतवणूक चालू ठेवली त्यांना आता चांगले बक्षीस मिळताना दिसत आहे.