शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिनाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. नुकतेच ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी परिसराला भेट देत नियोजनाचा आढावा घेत पोलीस अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या आहेत.
कोरेगाव भीमासह शिक्रापूर येथे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट देत विजयस्तंभ परिसर पाहणी करीत शौर्यदिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते.
दरम्यान, पंकज देशमुख यांनी शिक्रापूर येथून समाज बांधवांसाठी असलेल्या बसेस व्यवस्थेबाबत माहिती घेऊन समाज बांधवांना कशा पद्धतीने आसन व्यवस्था तसेच प्रवास सोपा होईल, याबाबत चर्चा करत प्रत्येक पार्किंगमध्ये जाणाऱ्या समाज बांधवांसाठी स्वतंत्र कक्ष करण्याबाबत योग्य सूचना पोलीस अधिकाऱ्यांसह आदी विभागाला दिल्या आहे.