जिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन

विलास नलगे
आतापर्यंत 42 टक्‍के पेरण्या; परतीच्या पावसामुळे गव्हाचे क्षेत्र वाढणार

नगर – परतीचा दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारा असल्याने जिल्ह्यात 6 लाख 67 हजार हेक्‍टरवर पेरणी वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी हरभरा पिकासह गव्हाचा पेरा वाढणार आहे.

यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतही वार्षिक सरासरी भरून काढणारा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. परतीच्या पावसानेही बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी देखील पावसाने ओलाढली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग, उडीद काढलेल्या क्षेत्रावर हरभरा व जेथे सिंचनाची सोय आहे, तेथील शेतकऱ्यांनी गहू पिकाचे नियोजन करू न पेरणीची तयारी केली.

काही ठिकाणी पेरणीस प्रारंभही झाला आहे. हरभरा पीक पेरणी मोठ्या प्रमाणावर होत असते. तथापि, गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे हे पीक शेतकऱ्यांना घेता आले नव्हते. यावर्षी पोषक स्थिती निर्माण झाली असून, त्यादृष्टीने कृषी विभाग व शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.

यावर्षी कृषी विभागाने 6 लाख 67 हजार 261 हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन केले असून आतापर्यंत 2 लाख 80 हजार 334 हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. परतीच्या पावसामुळे अजूनही बहुतांशी भागात वाफसा न मिळाल्याने शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत 42 टक्‍के पेरणी झाली असून त्यात सर्वाधिक ज्वारीचे 41 टक्‍के पेरणी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.