तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहरात पर्यावरणपूरक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
यात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि जलप्रदूषण रोखणे या अनुषंगाने नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन ठराविक ठिकाणी करणे, तसेच मूर्तीदान करणे यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी तलाव, विहिर, नदी अथवा इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन न करता नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या विसर्जन केंद्रावर विसर्जन करावे अथवा मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.
तळेगाव नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांच्या सोयीकरिता शहरात विविध ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
तसेच ज्या नागरिकांना घरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे, अशा नागरिकांना नगरपरिषद कार्यालय आणि संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ या दोन ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येत आहेत.
तसेच मूर्तीदान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
शहरातील मूर्तीदान व विसर्जन केंद्र
१) नथूभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान
२) गाव तळे जवळ
3) गाव तळे शेजारी खंडोबा माळ
४) आदर्श शाळेजवळ
५) यशवंतनगर गोल ग्राउंड
६) प्राथमिक शाळा क्रमांक ६/ गुलाबी शाळा
७) डी-मार्ट शेजारी
८) मूर्तीदान केंद्र – बनेश्वर मंदिर
९) मूर्तीदान केंद्र – नगरपरिषद कार्यालय समोर