शंभरपैकी 70 कोटींच्या कामांचे नियोजन : वाकळे

महापालिका हिस्सा न घेताच शंभर कोटी द्या, मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

नगर – महापालिकेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नगर शहराच्या विकासासाठी शंभर कोटी निधी उपलब्ध झाला असून या निधीतून शहरासाठी आवश्‍यक असलेल्या विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. शंभर कोटीपैकी 70 कोटी रुपयांपर्यंतच्या विकास कामांचे नियोजन झाले असून उर्वरित कामांचे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नगर शहराच्या विकासासाठी दि. 4 फेब्रुवारी 2019 रोजी शंभर कोटींच्या प्रस्तावास तत्वता मान्यता दिली आहे. परंतु शासनाच्या निर्देशानुसार शंभर कोटीपैकी 70 कोटी शासन देणार असून उर्वरित 30 टक्‍के रकम म्हणजे 30 कोटी रुपये महापालिकेचा हिस्सा राहणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता 30 कोटी हिस्सा देणे शक्‍य नसल्याने शासनाने महापालिकेला संपूर्ण शंभर कोटीचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे वाकळे यांनी सांगितले. त्यानुसार शंभर कोटी रुपये निधीतून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी सल्लागार समितीची लवकरच नियुक्‍ती केली जाणार असून कामांची निवड करून कामांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. शंभर कोटींच्या निधीतून विकास कामांचे नियोजन करण्यात येत असून आतापर्यंत 70 कोटीपर्यंत विकास कामे निश्‍चित केली. त्यात शहरातील प्रमुख रस्ते, उद्यान व नेहरू मार्केटची उभारणी करण्याचे नियोजन आहे. नेहरू मार्केट महापालिका स्वतः विकसित करणार आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत तयार होईल,असे वाकळे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.