मॉस्को- रशियामध्ये आज सकाळी बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले असून या अपघातामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रशियातील फार ईस्ट विमानतळापासून काही मैलांवर झाला. याच विमानतळावर हे विमान उतरणे अपेक्षित होते. या विमानातील सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची भीती आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खराब हवामानामुळे या विमानाचा मियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते पलाना शहरातील विमानतळाजवळ आल्यावर रडारवरून दिसेनासे झाले होते, असे कामचातका भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या विमानाचे अवशेष विमानतळापासून 3 मैलांच्या अंतरावर आढळून आले आहेत, असे रशियाची सरकारी विमान सेवा एजन्सी असलेल्या रोसाव्हिएशन कंपनीने म्हटले आहे.
विमानातील जळत्या भागांमधून आलेला धूर जवळच्या डोंगरावरदेखील आढळून आले आहे. तर विमानाचे काही अवशेष जवळच्या ओखोत्स समुद्रातही पडलेले आढळून आले आहे. हे विमान अंशतः समुद्रात कोसळले. मात्र हा भाग विमान उतरण्याच्या धावपट्टीचा नाही, असे कामचातका एव्हिअशन एन्टरप्राईजचे उपसंचालक सर्जी गोर्ब यांनी सांगितले.
हे विमान 1982 पासून कार्यरत होते. विमानाने पेट्रोपावलोवस्क कामचास्की येथून उड्डाण करण्यापूर्वी त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नव्हता, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विमानामध्ये 22 प्रवासी आणि 6 कर्मचारी असे एकूण 28 जण होते.
त्यांच्यापैकी कोणीही वाचू शकले नाही. पलाना मधील स्थानिक सरकारचे प्रमुख ओल्गा मोकिरेवा हे होते. मात्र मृतांपकी कोणाचाही मृतदेह मिळू शकलेला नाही, असे कामचटका सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले.