बीजिंग – पश्चिम मंगोलियामध्ये एका 15 वर्षीय मुलाचा बुबॉनिक प्लेगने मृत्यू झाला. प्रयोगशाळेतील चाचणीत हा मृत्यू प्लेगने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्लेगबाधित खारीच्या संपर्कात आल्याने
त्याला ही बाधा झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर गोबी अल्ताई प्रांताच्या एका भागाचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या 15 मुलांचे विलगीकरण करण्यात आले आहे, असे वृत्त मॉण्टसेम या वृत्तसंस्थेने दिले आहे. अन्य एका घटनेत चीनच्या सीमेशेजारील मंगोलियाच्या भागात एका व्यक्तीला प्लेग झल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे,
अशी माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था जिन्हुआने दिली आहे. मंगोलियाच्या बायान्नूर भागातील लोकांनी खारी खाऊ नयेत, म्हणून सरकारने आवाहन केले आहे. तसेच कोणतेही जनावर मरण पावले
असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.