पुणे-शहरातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. शुभम राजेंद्र हिंगाडे (वय २६, रा. ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध कोयता, चाकू, तलावरी सारखी जीवघेणी हत्यारे बाळगून गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.
शुभम याची गुन्हेगारी कृत्ये २०१९ पासून सुरू आहेत. त्याच्या विरूध्द चार गुन्हे दाखल असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही शुभमच्या गुन्हेगारी कृत्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर चतुःशृंगीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळ यांनी त्याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गंत प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्तांना पाठविला. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी शुभमला २० नोव्हेंबरपासून एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत