दुबई – भारतात तयार झालेल्या दागिन्यांना जागतिक पातळीवर मागणी आहे. आता करोना व्हायरसचा प्रभाव संपुष्टात आल्यामुळे भारतातील दागिने उत्पादकांनी प्रत्येक वर्षाला 100 अब्ज डॉलरपर्यंत निर्यात करावी असे आवाहन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
भारतीय दागिने उत्पादकांनी आपल्या दर्जा आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ केल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल. निर्यातदारांना काहीही मदतीची गरज असल्यानंतर त्यांनी वाणिज्य मंत्रालयाला या संदर्भात माहिती द्यावी. ही मदत वेळीच उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे गोयल म्हणाले.
चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय निर्यातदारांनी 400 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे.
या निर्यातीमध्ये भारतातील दागिने उत्पादकांचा वाटा तब्बल दहा टक्के आहे. यामध्ये वेगाने वाढ होऊ शकते. दागिने उत्पादक प्रोत्साहन परिषदेत बोलताना गोयल म्हणाले की, भारत मध्यपूर्वेतील देशासह इतर अनेक देशाबरोबर व्यापार वाढविण्यासाठी करार करीत आहे. या करारामुळे या देशाबरोबर निर्यात करण्यास पोषक वातावरण निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.
मध्यपूर्वेतील देशांबरोबर व्यापार करार केल्यामुळे या देशांना दागिन्याबरोबरच कापड, औषधे आणि रसायनाची निर्यात होण्यास मदत होणार आहे. कराराबद्दल दागिने निर्यातदार परिषदेचे अध्यक्ष कॉलिन शहा यानी समाधान व्यक्त केले. मात्र सोन्याच्या आयातीवर अजूनही मोठ्या प्रमाणात शुल्क आहे ते शुल्क कमी करण्याच्या शक्यतेवर केंद्र सरकारने विचार करावा.
या अगोदरही शुल्क कमी करण्याचे आश्वासन मिळवूनही या संदर्भात कार्यवाही झाली नसल्याबद्दल शहा यांनी असमाधान व्यक्त केले. करोनाच्या कालावधीत भारतातून दागिन्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.