अबाऊट टर्न: पीआययू

हिमांशू
“पीआययू’ हे लघुरूप दोनतीनदा ऐकूनसुद्धा त्याविषयी फारसा विचार करावा असं वाटलं नव्हतं. एकतर आजकाल आपल्या भाषाच इतक्‍या संकोचून गेल्यात की, अनेक गोष्टींसाठी आपण लघुरूपंच वापरतो. रस्त्यावरून जाता-येता, घरात, ऑफिसात, हॉटेलात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ऐकू येणाऱ्या भाषेत पूर्ण शब्दांऐवजी लघुरूपंच अधिक ऐकायला मिळतात. प्रत्येक क्षेत्राची स्वतंत्र परिभाषा बनलीय आणि भाषेपेक्षा ती अधिक महत्त्वपूर्ण बनलीय; त्यामुळं ऐकलेल्या संज्ञेतली एखादी आपल्याशी संबंधित असेल, तरच विचार करायची वेळ येते.

“पीआययू’ हे डिजिटल विश्‍वाशी संबंधित असंच एखाद्या संज्ञेचं लघुरूप असावं, असं समजून आम्ही त्याकडे कानाडोळा केला होता; पण ही भानगड आपल्या सगळ्यांशीच संबंधित आहे, असं समजल्यावर कान आपोआप टवकारले. “पीआययू’चं पूर्णरूप “प्रॉब्लेमेटिक इंटरनेट यूजर’ असं आहे, हे समजल्यावर वाटलं, की नेटवर्क नीट मिळत नसल्यामुळं इंटरनेट वापरताना येणाऱ्या प्रॉब्लेमशी संबंधित ही संज्ञा असावी. परंतु ती तंत्रज्ञानाशी संबंधित नसून माणसाशी संबंधित आहे, हे ऐकून माणूस असल्याचा बऱ्याच दिवसांनी अभिमान वाटला. अर्थात, तो फार काळ टिकला नाही. कारण या संज्ञेची जसजशी उकल होत गेली, तसतसा आमच्या कपाळावर घाम साचू लागला. इंटरनेटचं वाईट व्यसन जडलेली व्यक्‍ती, असा “पीआययू’चा सोपा अर्थ आहे. या माहितीजालाचा माहिती मिळवण्यासाठी खरोखर किती उपयोग होतो, हे सर्वज्ञात आहे.

आपल्याकडे आता डेटा महागणार आहे हे कबूल; पण दारू महागली म्हणून पिणाऱ्यांची संख्या कमी होते का, असा प्रश्‍न आमच्या मित्रानं विचारला, तेव्हा आम्ही नखशिखान्त हादरलो. सोशल नेटवर्किंग, (सोयीचं) सर्फिंग आणि इंटरनेट गेमिंग हे इंटरनेटचे आपल्याकडील प्रमुख उपयोग होत. हे एक असं त्रिकुट आहे, ज्याचं व्यसनच आपल्याकडे बहुतेकांना जडलंय आणि व्यसनापुढे माणूस ना पैशाचा विचार करतो ना वेळेचा! शाळकरी मुलांपासून अनेकजण “पीआययू’ झालेत असं हे दाखवून देणारा एक सर्व्हे नुकताच झालाय. 37 टक्‍के शाळकरी मुलं अभ्यासाचा तणाव दूर करण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतात, असं हा सर्व्हे सांगतो.

दिल्लीतल्या 25 शाळांमधल्या 6 हजारांहून अधिक मुलांच्या सवयींचा अभ्यास अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि दिल्ली पोलिसांनी एकत्रितपणे केला. 15 निकषांच्या आधारावर गुणांकन केलं गेलं आणि ज्यांना 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले, अशी 19 टक्‍के मुलं “नापास’ ठरली. विशेष म्हणजे, जे पाश्‍चात्य देश आपण तंत्रसमृद्ध म्हणून ओळखतो, त्या देशांपेक्षा आपल्याकडील आकडेवारी खूपच अधिक आहे. सोप्या भाषेत याला “डिजिटल ऍडिक्‍शन’ म्हणतात आणि व्यसनमुक्‍ती केंद्रांप्रमाणंच जगात अनेक ठिकाणी डिजिटल डी-ऍडिक्‍शन सेंटर्ससुद्धा सुरू झालीत म्हणे! डिजिटल व्यसन जडलेली व्यक्‍ती म्हणजे “पीआययू’ ही अशा मानसिक अवस्थेला पोहोचलेली असते, जिथे ऑनलाइन गेम्स, नेट सर्फिंग, सोशल साइट्‌स याव्यतिरिक्‍त तिला काही सुचतच नाही. बेचैनी, अधीरता ही लक्षणं हळूहळू या व्यक्‍तीत दिसू लागतात आणि आभासी जगात वावरल्यामुळं वास्तवातील समस्यांपासून पळ काढण्याची, खोटं बोलण्याची वृत्ती बळावते. लवकरच अशी व्यक्‍ती पूर्णतः नकारात्मक बनून जाते. बापरे! सेलफोनशिवाय आपण किती तास… किती मिनिटं… जगू शकतो? पाहायला हवं!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.