पिसावरेच्या विद्यार्थ्यांचा फुलपाखरांवर अभ्यास

पक्षीनिरीक्षणातून शोधल्या दुर्मिळ, आकर्षक 24 प्रजाती

विसगाव खोरे – पिसावरे (ता. भोर) येथील पिसावरे माध्यमिक विद्यालयातील पक्षीनिरीक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी फुलपाखरांच्या निरीक्षणाच्या नोंदी केल्या असून, या अभ्यासातून 24 नवीन प्रजाती आढळल्या आहेत.

निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरे भोरकरांना सध्या आकर्षित करीत आहेत. निसर्गात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करीत असतात. संपूर्ण भारतात सप्टेंबर महिना “बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो.

या निमित्ताने लोकांच्या मनात फुलपाखरे आणि पर्यावरण या दोन्ही विषयी जागृती व्हावी, फुलपाखरांचे फोटो काढणे, चित्रे काढणे यांसारख्या कृतीसोबत शास्त्रीय पद्धतीचा वापर करून फुलपाखरांच्या नोंदी करणे आणि त्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदवणे, जेणेकरून देशातील सर्व माहिती एकाच ठिकाणी नोंदवली जाऊन माहितीकोश तयार होईल आणि भारतातील जैवविविधतेची जपणूक करता येईल, या उद्देशाने हा अभ्यास करण्यात आला.

पिसावरे माध्यमिक विद्यालय व एमडब्लूओ पक्षी निरीक्षण मंडळ यांनी मिळून तीस मिनिटे शास्त्रीय पद्धतीवर फुलपाखरांच्या निरीक्षणाचे आयोजन केले होते. या निरीक्षण भेटी दरम्यान कॉमन रोझ, प्लेन टाइगर, कॉमन इव्हिनिंग ब्राऊन, कॉमन क्रो,इंडीयन जिझाबेल, टेल्ड जे, कॉमन ग्रास यलो, स्वीफ्ट, बॅन्डेड बुश ब्राऊन अशा विविध 24 प्रजातींच्या 75 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या नोंदी करण्यात आल्या.

ही माहिती संबंधित संकेतस्थळावर भरण्यात आली. शुभांगी बरदाडे आणि विनायक साप्ते या एस. पी. कॉलेजमधील प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी प्रधान, विद्या बरदाडे,स्नेहल प्रधान, वैभव प्रधान आदी विद्यार्थ्यांनी या नोंदी केल्या. पक्षी निरीक्षण मंडळाचे प्रमुख संतोष दळवी यांनी विद्यार्थ्यांना फुलपाखरांच्या निरीक्षणाच्या नोंदी करण्यास सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.