पाटणला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटली

लाखो लिटर पाणी वाया; पाणी विकत घेण्याची नागरिकांवर वेळ

पाटण – पाटण शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन एल ऍन्ड टी कंपनीच्या खोदकामामुळे फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून सलग दोन दिवस पाटण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पाटण शहारात पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

कराड-चिपळूण या महामार्गाचे काम सध्या चालू आहे. कंपनीच्या बेजाबदार कामाला अगोदरच नागरिक कंटाळले असताना कंपनीने एमआयडीसी तामकडे याठिकाणी रस्ता खोदताना कोणतीही काळजी घेतली नसताना पुन्हा याठिकाणी पाटण शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फोडली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असूनही पाईपलाइन दुरुस्त होईपर्यंत पाटण शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात असून नगरपंचायत व कंपनीच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाईपलाइनच्या ठिकाणी खोदकाम करताना नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र कोणीही कर्मचारी घटनास्थळी नसल्याने रस्ता खोदताना पाण्याच्या पाईपचा अंदाज न आल्याने पुन्हा पाईपलाइन फुटली आहे. यामुळे शहराला किमान दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने पाणी विकत घ्यायची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यात पाणीबाणी सुरू असताना कराड, सातारा यासारख्या मोठ्या नगरांमध्ये तांत्रिक चुका आणि बेपर्वाईमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसाच काहीसा प्रकार पाटणमध्ये घडल्याने तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

 

पाटण शहाराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन एमआयडीसी तामकडे याठिकाणी फुटली होती. बुधवारी ती दुरुस्त करण्यात आली. मात्र पुन्हा पाण्याच्या प्रेशरने पाईपलाइन फुटली आहे. उद्यापर्यंत पाटण शहराला पाणीपुरवठा होईल याची खबरदारी घेतली आहे. मात्र खोदकाम करताना एल ऍन्ड टी कंपनीने नगरपंचायतीला सूचना देणे गरजेचे होते. मात्र कोणतीही सूचना नगरसेवक अथवा नगरपंचायतीला कंपनीने दिली नाही. 

बापूराव टोळे, नगरसेवक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×