- मृत्यूदर दोनपेक्षा कमी ठेवण्यात यश
- एकूण चाचण्यांच्या 77 टक्के चाचण्या निगेटिव्ह
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण मिळून आला. या महिन्यात 12 रुग्णांची नोंद करण्यात आली. सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने करोनाचा हॉटस्पॉट म्हणून पिंपरी चिंचवडकडे बघितले जाऊ लागले होते. आता शहरातील बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मृतांचीही संख्या कमी होत असून, बाधित येणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर शहर करोनाबाबतीत विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. शहरामध्ये दररोज बाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत शहरातील 82 हजारांहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला राहिला.
सद्यःस्थितीत शहरामध्ये 95.65 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर अवघ्या 2.61 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच आतापर्यंत एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1.75 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यूदर 2 पेक्षा जास्त होऊ न देण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे.
करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना शोधणे मोठे आव्हान होते. त्यासाठी प्रशासाने जास्तीतजास्त तपासणी करण्यावर भर दिला. आजपर्यंत शहरामध्ये पावणे चार लाख नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 77.67 टक्के नागरिक निगेटिव्ह आले आहेत. शहरात आतापर्यंत 86 हजार 636 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 130 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहराबाहेरील 622 रुग्णांचा समावेश आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये करोनावाढीला ब्रेक लागला आहे. शहरामध्ये 28 सप्टेंबरला रुग्णसंख्येत मोठी घट झाली. यादिवशी शहरामध्ये 554 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सुमारे 28 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 8 हजार रुग्णांची भर पडली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये दरदिवशी सुमारे 1000 ते 1200 रुग्णसंख्या येत होती. ती रुग्णसंख्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दररोज 200 ते 250 याप्रमाणे येत आहे. मागील 20 दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर रोज येणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त बरे होणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर करोना विषाणूच्या विरोधात लढत असलेल्या लढाईमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ऑक्टोबर महिन्यात अकरा हजारांहून अधिक रुग्ण बरे
ऑक्टोबर महिन्यामध्ये करोनाचा आलेख बराच खाली आला आहे. रुग्णसंख्या घटत असताना बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 1 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत शहरामध्ये 11 हजार 655 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर या काळात 7 हजार 922 रुग्णांची भर पडली आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने शहरामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
काळजी आवश्यक
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी अद्याप करोना गेलेला नाही. त्यामुळे दसरा व दिवाळीमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एका ठिकाणी जास्त गर्दी करू नये. बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड करू नये. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.