पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छतेसाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी आठ शाळांमध्ये झिरो वेस्ट (शून्य कचरा) मोहीम राबवण्यात येणार आहे.
महापालिका प्रशसानाने ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना देखील याचे महत्त्व समजावे यासाठी शाळा स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आठ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर झिरो वेस्ट ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत कचरा तयार होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
शाळा स्तरावर सुका कचरा व भंगार व्यवस्थापन समिती, रोपे – वृक्षारोपण कुंड्या सजावट व संगोपन समिती, दैनंदिन शाळा स्वच्छता व सजावट समिती, शून्य कचरा प्रबोधन व संस्कार वर्ग समिती, स्वच्छ पाणी-किचन भांडी-स्वच्छतागृह समिती, ओला कचरा कंपोस्टींग – हिरवा चारा व्यवस्थापन समिती, प्लॅस्टिक पेपर व्यवस्थापन समिती अशा पद्धतीने समित्या तयार करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर काम करण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. तसेच ओला, सुका, घातक, जैववैद्यकीय अशा कचऱ्यांचे वर्गीकरण करुन त्याची योग्य व्यवस्था लावण्याचे प्रशिक्षण देखील मुलांना दिले जाणार आहे.
त्यासाठी मेसर्स आसरा सोशल फाउंडेशन या संस्थेची प्रायोगिक तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला दरमहा प्रतिशाळा 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. सहा महिन्यांसाठी एकूण 2 लाख 40 हजार रुपये मोबदला या संस्थेला दिला जाणार आहे. त्याला महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.
भंगारवाला होणार “स्वच्छतादूत’
भंगार व्यवस्थापन समितीमध्ये असलेल्या वस्तूंचा देखील पुनर्वापर केला जाणार आहे. भंगार वस्तू देताना त्यातून आलेल्या पैशांचा व साहित्याचा वापर नवीन वस्तू निर्मितीसाठी होईल. तसेच भंगारवाल्याचा देखील स्वच्छतादूत म्हणून समितीत समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा डबा खाऊन झाल्यावर राहणारे खरकटे एकत्र करत ते हिरवा चारा म्हणून जनावरांना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.