कान्हे : मावळ तालुक्यात सध्या क्रिकेट टुर्नामेंटचा हंगाम सुरू आहे. यात शालेय विद्यार्थ्यांसह सर्वच स्तरावरील तरूण वर्ग गुंतलेला दिसतो. जानेवारी पासून ते मार्च – एप्रिलपर्यंत हा क्रिकेट टुर्नामेंटचा हंगाम सुरु असतो. गावोगावी लहान मोठी मंडळे, प्रतिष्ठान, नेते मंडळी यांच्याकडून क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धांमध्ये असणारी आकर्षक बक्षिसांमुळे तालुक्यातील सर्व ठिकाणचा तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात क्रिकेटकडे ओढला जात आहे. यातून विद्यार्थ्यांचे शालेय अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, तर कामगार वर्ग असलेल्या युवकांचे रोजच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकही मुलांच्या या क्रिकेटच्या नादामुळे चांगलेच चिंतातुर झाले आहेत.
क्रिकेटच्या सततच्या स्पर्धांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. एकएका गावात क्रिकेटचे चार पाच संघ आहेत. यामुळे क्रिकेटची आवड असणाऱ्या, खेळता येणाऱ्या इच्छुक मुलाला कुठल्या ना कुठल्या संघात आग्रहाने घेतले जाते. मित्रांच्या आग्रहामुळे मग अपोआपच अभ्यास बाजुला पडतो. दुसरीकडे क्रिकेटचे मैदान सोडले तरीही दिवसभर स्पर्धेच्याच गप्पा गोष्टी सुरु असतात. तयारी सुरु असते, यामुळे शालेय जीवनातील मुळ उद्देश बाजूला पडतो.
हीच परिस्थिती नोकरी व्यवसाय करणाऱ्या तरूणांबाबतही आहे. छंद म्हणून क्रिकेट खेळणारी ही मंडळी दोन तीन महिने क्रिकेट टुर्नामेंट मध्येच वाहवत जात असून त्यांचेही काम धंद्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या क्रिकेटच्या ‘नादापासून’ पोरांना कसं दूर करायचं, याची चिंता आता पालकांना लागून राहिली आहे.
तरूणांनी वेळीच सावरणे गरजेचे
क्रिकेटसाठी कामावर सतत गैरहजर राहिल्याने काही युवकांना कंपनीतून कामावरुन काढून टाकल्याचे प्रकार घडले आहेत. तळेगाव, आंबी, चाकण एमआयडीसी भागात आधीच नोकरीच्या संधी कमी असून इच्छुक उमेदवार जास्त अशी परिस्थिती आहे. यामुळे कामावर चालढकल करणाऱ्या अशा क्रिकेटवेड्या तरूणांना कामावरून कमी करण्यात कंपनी प्रशासन मागे पुढे पाहत नाही. यातून तरी आता नोकरदार तरूण धडा घेतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे परीक्षा आणि शाळा बुडविणाऱ्या मुलांचेही भविष्य यामुळे अनिश्चित होत आहे, यात शंका नाही.