पिंपरी : थेरगाव येथे पवना नदीवर बटरफ्लाय आकारातील स्टील गर्डरमधील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणार्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा पूल अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर 7 वर्षे झाले या पुलाचे काम रखडले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी बैठकीत या जोडरस्त्याचे काम पूर्ण करून प्रजासत्ताकदिनी हा पूल सार्वजनिक वाहतुकीकरिता खुला करून देण्याच्या मौखिक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, जोडरस्त्यांना पुलासमान उंची देण्याचे काम सुरू असून, हे काम येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रजासत्ताकदिनी हा पूल नागरिकांसाठि खुला होण्याची शक्यता कमी आहे.
चिंचवडगाव ते थेरगावाला जोडणारा बटरफ्लाय आकारातील स्टील गर्डर पूल उभारण्यात येत आहे. थेरगाव येथील विकास आराखड्यातील 18 मीटर रस्त्यावर हा पूल तयार केला जात आहे. मोरया गोसावी मंदिरापासून काही अंतरावर पवना नदीवर साकारणारा हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणार आहे. महापालिकेच्या सन 2016 -17 या आर्थिक वर्षात पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश देऊन कामाला सुरुवात झाली. या पुलाच्या कामासाठी 25 कोटी 19 लाख रुपये इतका खर्च मंजूर आहे. या पुलासाठी नदीपात्रामध्ये कोणताही पिलर टाकलेला नाही.
त्यामुळे पवना नदीचा प्रवाह सुरळीत वाहू शकणार आहे. थेरगाव पवना नदीवर साकारत असलेला बटरफ्लाय प्रकारातील राज्यातील हा पहिलाच पूल आहे. पुलावरील डांबरीकरण आणि जोड रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. 107 मीटर लांबीचा हा पूल आहे. 18 ते 28.20 मीटर इतकी पुलाची रुंदी आहे. महापालिकेकडून उभारण्यात येणार्या या पुलाला सात वर्ष लोटली तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. पुलाचे काम वेगात सुरु असल्याचे अधिकारी सांगत असले तरीही पुलाला जोडणार्या एका बाजूला काम अपूर्ण आहे. तर हे प्रलंबित काम वेगाने पूर्ण करण्याचे ठेकेदरासमोर आता आव्हान आहे.
बटरफ्लाय पुलाच्या जोडरस्त्यानजीक एका सोसायटीची संरक्षक भिंत असून, या रस्त्याच्या खोदकामामुळे या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेत, ठेकेदाराविरोधात या सोसायटी पदाधिकार्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यामुळे हे काम रखडले होते. मात्र, सोसायटीचे पदाधिकारी, ठेकेदार व महापालिका अधिकारी यांची पोलिस स्टेशनमध्ये एकत्रित बैठक झाली असून, सोसायटीने या कामाला होकार दिल्याने हे काम सुरू करण्यात आले आहे.
-देवन्ना गट्टूवार,
सहशहर अभियंता, पिंपरी चिंचववड मनपा
वाहतुकीवरील ताण कमी होणार
थेरगाव आणि चिंचवडला जोडणारे दोन पूल सध्या पवना नदीवर आहेत. बिर्ला रुग्णालयाजवळ मोठा, तर धनेश्वर मंदिराजवळ छोटा पूल आहे. हा छोटा पूल अरुंद असल्याने येथून अवजड वाहनांची वाहतूक होत नाही. त्यामुळे प्रसूनधाम सोसायटीशेजारी नव्याने उभारण्यात येत असलेला पूल वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या पुलाने थेरगाव येथील चिंचवड आणि तेथून पिंपरी सहजतेने ये-जा करणे वाहनचालकांना शक्य होणार आहे.