आठ कोटींचा खर्च; जुलैपर्यंत पूर्ण होणार काम
पिंपरी – पिंपरी येथे महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. जुलै महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. संबंधित जागेत दिव्यांगांना विविध प्रकारचे प्रशिक्षण, स्वावलंबनासाठी मार्गदर्शन, विविध वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पिंपरी, प्रभाग क्रमांक 10 येथे 1 हजार 791 चौरस मीटर जागेत संबंधित केंद्राची तळमजल्यासह चार मजली इमारत उभारण्याचे काम करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्राचे निवासी क्षेत्रात (आय टू आर) रूपांतर करण्याच्या बदल्यात संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाली आहे. प्रकल्पाच्या आराखड्याला 18 डिसेंबर 2017 रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली. संबंधित प्रकल्पाच्या कामाला 12 मार्च 2018 रोजी सुरुवात झाली. काम पूर्ण करण्यासाठी 11 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, मुदतीत काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या कामासाठी जुलै-2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. कामासाठी एकूण 8 कोटी 6 लाख रुपये इतका खर्च मंजूर आहे.
काय असणार कल्याणकारी केंद्रात
तळमजला : चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग तसेच मुलांना खेळण्यासाठी बगीचा व चौकीदार रूम
पहिला मजला : 600 लोकांसाठी बहुउद्देशीय सभागृह, स्वागतकक्ष, कार्यालय, जॉइन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरूष स्वच्छतागृह
दुसरा मजला : दिव्यांग क्लासरूम (गणित, प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष.
तिसरा मजला : सुधार उद्देशक वर्ग – 1, 2, 3.
दृष्टीबाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग
चौथा मजला : व्यवसाय, प्रशिक्षण श्रवण व वाचा विभाग, भौतिकोपचार विभाग, मानसोपचार विभाग
अर्थसंकल्पात एकत्रित तरतूद
महापालिकेच्या 2020-21 या वर्षीच्या अर्थसंकल्पात पिंपरीत दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र, आकुर्डी येथे मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाची उभारणी, थेरगाव येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे, जिजामाता रुग्णालय (पिंपरी) येथील नवीन इमारत आदींसाठी एकूण 17 कोटी 95 लाख रुपयांची एकत्रित तरतूद ठेवण्यात आली आहे.