पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी (दि. २४) सकाळी सहा वाजेपर्यंत १४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पवना धरणातील पाणीसाठा 54.13 टक्क्यांवर गेल्याने पिंपरी चिंचवडकरांची निम्म्या वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे.
गेल्या वर्षी आजच्याच तारखेपर्यंत पवना धरण परिसरात 1342 मि.मी. इतका पाऊस पडला होता. मात्र यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत 1222 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 61.12 टक्के पाणीसाठा होता. तर यंदाच्या वर्षी 54.13 टक्के इतका पाणीसाठा धरणात आहे. बुधवारी (दि. 24) सकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 145 मि.मी. पावसाची नोंद झाली. एका दिवसांत धरणातील पाणी साठ्यात 4.83 टक्के वाढ झाली आहे.