नाणे मावळ : उन्हाळा सुरू झाला असून हळू हळू उन्हाची तीव्रता देखील वाढू लागली आहे. उन्हाळा हा जसा मनुष्यासाठी त्रासदायक, तसाच मुकजीवांसाठीही तो तितकाच कठीण काळ असतो. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मावळ तालुक्यातील डोंगर भागात सध्या वणवे लागण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने नैसर्गिक पाणवठे, ओढे, ओहोळ सुकू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वन्यप्राण्यांना देखील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते. या सर्व पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात वनविभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मावळ तालुक्यात वडगाव व शिरोता असे दोन वन विभाग आहेत. दोन्ही विभागात मिळून सुमारे तीस हजार हेक्टर वन व खासगी वन क्षेत्र आहे. बहुतांशी वनक्षेत्र हे डोंगर रांगांनी व कड्या कपाऱ्यांनी व्याप्त आहे. वन क्षेत्रात विविध प्रकारचे वन्य पशू पक्षी आढळून येतात. उन्हाळ्यात वनक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना घडत असून त्यातून वन्य प्राण्यांना धोका निर्माण होतो. यासह उन्हाळ्यात पाण्याचे नैसर्गिक पाणीसाठे आटतात, त्यामुळे वन्यप्राणी अन्न व पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता वाढते. यामुळे वनविभागाने काही खास उपाययोजना केल्या आहेत.
वन क्षेत्रात पाणवठे
मावळ तालुक्यात पवना, वडीवळे, आंद्रा, वलवण, शिरोता, सोमवडी, ठोकळवाडी, जाधववाडी, मळवंडी ठुळे इत्यादी धरणे आहेत. या धरणांमधून वन्य प्राण्यांना बारमाही पाणी उपलब्ध असते. यासह शिरोता वनविभागात ४२, तर वडगाव वनविभागात सुमारे ३५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाचे कर्मचारी वेळोवेळी टँकरद्वारे हे पाणवठे भरतात व त्यांच्यातील गाळ काढून ते स्वच्छ ठेवतात.
वणवे रोखण्यासाठी नियोजन
वनक्षेत्रात लागणारे बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. धुम्रपान करणारे नागरिकांकडून अनेकदा असे अपघात घडतात. यासह शेतीत राब जाळताना अनकेदा आग पसरून वणवे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर वनविभागाने वणवे रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. यात गावोगावी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली आहे. तसेच, आपदा मित्रांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवून वणवे रोखणे अथवा विझविणे यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. तसेच, वणवे रोखण्यासाठीच्या कीट देण्यात आले आहेत.
मावळात अनेक ठिकाणी वनक्षेत्राला लागून शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. उन्हाळ्यात भातशेतीमध्ये राब जाळताना अनेकदा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी राब जाळताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी केले आहे. तर, मावळात पर्यटकांची संख्या वाढली आहे. काही पर्यटकांमुळे यापूर्वी आगीच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळावी व वनक्षेत्रातून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केले आहे.