मावळ : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक येत्या २७ एप्रिल रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास गुरुवारपासून (दि.२० मार्च) सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि.२६ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली.
मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाचे २ हजार ८३७ सभासद असून, पाच मतदार संघात संचालकांच्या एकूण ११ जागा आहेत. त्यात सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ ६ जागा (खनिज आधारित उद्योग १, वनावर आधारित उद्योग १, कृषी आधारित व खाद्य उद्योग १, पॉलिमर व रसायन आधारित उद्योग १, अभियांत्रिकी व अपारंपरिक उद्योग १, वस्त्रोद्योग व सेवा उद्योग १), महिला प्रतिनिधी २ जागा, अनुसूचित जाती व जमाती मतदार संघ १ जागा, इतर मागास
वर्ग मतदार संघ १ जागा, भटक्या जमाती/विमुक्त जाती मतदार संघ १ जागा आहे.
सन १९७२ मध्ये मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना झाली असून वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालय जवळ संघाचे कार्यालय आहे. तीन वर्षापूर्वी संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली होती, परंतू राजकीय कुरघोडी व अन्य कारणांमुळे संघ बरखास्त होऊन प्रशासकीय कारभार सुरू होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये संघावर प्रशासकीय प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता नव्याने संचालक निवणूक जाहीर झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
२० ते २६ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करणे (सकाळी ११ ते दुपारी ३),
२७ मार्च – उमेदवारी अर्जांची छाननी,
२८ ते ११ एप्रिल मार्च – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
१५ एप्रिल – अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप
२७ एप्रिल – मतदान (सकाळी ९ ते दुपारी ४)
मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात येणार असून, निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली.
कुणाचे पारडे जड राहणार ?
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक आणि मावळ तालुक्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर सहकार क्षेत्रातील मावळ तालुका मर्यादीत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या या संस्थेवर आता कुणाची वर्णी लागणार हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे