पिंपरी, (प्रतिनिधी) – गेली अनेक दिवसांपासून पिंपरी विधासनभा मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व भाजपच्या शहर पातळीवरील पदाधिकार्यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये अनुसूचित प्रवर्गाकरिता राखीव असलेली पिंपरी विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
भाजप व महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची संयुक्त महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या अध्यक्षतेखाली वाकड येथे पार पडली.
आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांनी एकदिलाने काम करावे, असा निश्चय करण्यात आला. तसेच व पिंपरी विधानसभेच्या जागेकरिता आग्रही असलेल्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी, असा ठराव करण्यात आला. दोन्ही पक्षाची सकारात्मक चर्चा झाली.
य बैठकीत रिपाइं शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी रिपब्लिकन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. तसेच सत्तेमध्ये रिपाइंचा वाटा देण्याची मागणी केली.
या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शंकर जगताप यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाजपच्या कोअर समितीकडून विचारणा झाल्यास पिंपरी विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची बाजू मांडण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, रिपब्लिकन पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, रिपाइंचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष चिंचवड विधानसभेचे प्रमुख काळूराम बारणे,
मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, सम्राट जकाते, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक सिकंदर सूर्यवंशी, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष विनोद चांदमारे, माजी नगरसेविका लता ओव्हाळ, महिला उपाध्यक्ष महाप्रदेश इलाताई ठोसर,
विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुजित कांबळे, कामगार आघाडीचे अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष शादाब पठाण, सरचिटणीस कार्याध्यक्ष योगेश भोसले,
कार्याध्यक्ष राजू उबाळे, दयानंद वाघमारे, सरचिटणीस बाबा सरोदे, चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष नितीन पटेकर, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष संजय सरोदे, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष दादा शिरोळे, महिला आघाडीच्या पदाधिकारी रत्नमाला सावंत आदी उपस्थित होते.
या बैठकीतील मागण्या
– महायुतीच्या जागा वाटपात पिंपरी विधानसभा मतदार संघ रिपब्लिकन पक्षाला सोडावा.
– प्रत्येक विधानसभेत 4 या प्रमाणात आगामी पालिका निवडणुकीत रिपाइंला 12 जागा मिळाव्यात.
– समाजाशी नाळ जोडलेल्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी.
– महापालिकेसह महायुतीची सत्ता असलेल्या सत्ताकेंद्रांमध्ये रिपाइंला वाटा द्यावा.