तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने लाखो रूपये खर्च करून बांधलेले स्वच्छतागृह अज्ञातांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने पाडले आहे. शनिवार (दि.१) रोजी हे स्वच्छतागृह पाडण्यात आले. परंतु अद्याप याप्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आली नसून स्थानिकांनीही कुणाचेही नाव न घेता सीसीटीव्ही पाहून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेने बांधलेले स्वच्छतागृह शनिवारी (दि.१) ज्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाडले. ते पाडतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात यंत्रणांना दिसून येईल, त्याआधारे प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
दरम्यान, तळेगाव शहरातील खळदे आळी सारख्या वर्दळीच्या भागात नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून हे स्वच्छतागृह उभारले होते. परंतु ज्यांनी हे स्वच्छतागृह पाडले, त्याबाबत पालिका प्रशासन आणि नागरिक अनभिज्ञ आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवसाढवळ्या जेसीबीने स्वच्छतागृहाची तोडफोड होत होती, तेव्हा काही नागरिकांनी हटकल्यानंतर जेसीबी चालक पळून गेला. त्यामुळे सीसीटीव्हीत सर्व दिसेल, असे नागरिकांनी सांगितले.
नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा व स्वच्छतागृह पुन्हा बांधावे, अशी मागणी होत आहे. तर जनतेच्या पैशाची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान याबाबत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनाही हे कृत्य करणाऱ्याचे नाव ठावूक नाही. उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून ‘हे स्वच्छतागृह कोणी पाडले, याबाबत चौकशी करण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याबाबत तपास चालू आहे,’ असे सांगितले.