पिंपरी : महापालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणार्या सुविधांबाबत फलकांद्वारे माहिती दिली जाते. मात्र काही फुकटे जाहिरातदार या माहिती फलकांवरच जाहिरात फलक लावते. अशा फुकट्या जाहिरातदारांवर महापालिकेने कडक कारवाइ्र करणे गरजेचे आहे.
सुंदर अन् स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर, अशी जाहिरात पिंपरी चिंचवड महापालिका करीत आहे. रावेत परिसरात महानगरपालिकेकडून नागरिकाचे सेवेसाठी असलेल्या पादचारी मार्ग, सायकल मार्ग, रस्त्याचे बाजूला चारचाकी वाहनासाठी पार्किंग अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सुविधांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी पालिकेकडून सूचना दर्शक फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. या फलकावर कोणत्याही प्रकारची खासगी जाहिरातीचे फलक लावणे अपेक्षित नाही. परंतु अनेक जाहिरातीचे फलकांसाठी या दिशादर्शक फलकांचा उपयोग सर्रासपणे होताना दिसत आहे. या फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे.
या फुकट्या जाहिरादारांमुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करणार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करता येतो. तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्याची तरतूद आहे. हवेमुळे जाहिरात फलक दुचाकीस्वाराचे अंगावर पडून अपघाताची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे अशा फुकट्या जाहिरातदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.