पिंपरी – दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर खूनी हल्ला करून आलेल्या दोन आरोपींनी पिंपळे निलख परिसरात अक्षरशः धिंगाणा घातला. रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक वाहनावर आणि दुचाकीस्वारांवर कोयत्याने वार करत दोन गुंडांनी संपूर्ण रस्ताच अडवून धरला. या दोन गुंडांना घाबरुन अनेक नागरिकांनी आपली वाहने वळवून पळ काढला.
ही घटना रविवारी (दि. 4) रात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. आता पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावळे (दोघेही रा. पिंपळे निलख) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी आरोपींनी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर कोयत्याने वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बेभान झालेले हे आरोपी पिंपळे निलख येथील रस्त्यावर आले.
एखाद्या चित्रपटाप्रमाणे रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांनी रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी वाहने अडविण्यास सुरुवात केली. हातातील कोयत्याने दिसेल त्या वाहनावर तसेच दुचाकीवरील नागरिकांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करु लागले. गुंडांची ही दहशत पाहून सर्वच वाहनचालकांनी आपली वाहने माघारी वळविली. जी वाहने समोर येत होती त्या वाहनांवर आरोपी कोयत्याने वार करीत होते.
एका दुचाकीस्वारावर वार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढा भीषण प्रकार घडत असताना एकाही नागरिकाने विरोध करण्याची अथवा पोलिसांना कळविण्याचे देखील धाडस केले नाही. तसेच घटनेची तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही. खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आणखी कलमवाढ केल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची सांगवी पोलिसांनी रविवारी धिंड काढाली.