देहूरोड : सरकारकडून, वन विभागाकडून सतत वृक्ष संवर्धन करा, वृक्ष लागवड करा, अशी जनजागृती करण्यात येते. मात्र देहूरोड हद्दीत लष्कराच्या भागामध्ये वन विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेली झाडे पाण्यावाचून सुकू लागली आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लष्करी भागामध्ये दोन वर्षांपूर्वी सुमारे अकरा हजार झाडे लावण्यात आली होती. वनपरिक्षेत्र विभागाच्या वतीने दोन वर्षे देखभाल करण्यात आल्याने सहा ते आठ फूट उंचीपर्यंत ती झाडे वाढली आहेत. यातील तीनशेहून अधिक झाडे देहू माळवाडी हद्दीलगत लावण्यात आली. मात्र या झाडांची योग्य देखभाल होत नसून पाण्यावाचून झाडे सुकू लागली आहेत.
प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. झाडे जगवली पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे, असे शासन, वनविभाग सातत्याने सांगत असते. परंतु लावलेली झाडे जगविण्याचे काम होणार नसेल तर वृक्षारोपण करून फायदा काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
निव्वळ प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड?
अनेक जण महापुरुषांच्या जयंती अथवा पुण्यतिथी अथवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करीत असतात. या कार्यक्रमाचे फोटो प्रसिद्ध करतात. परंतु यानंतर त्या वृक्षाचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाच प्रकारे ही झाडे देखील देखभाल होत नसल्याने सुकून गेली आहेत.
लष्कराने जागा उपलब्ध करून दिल्याने विविध प्रजातीची झाडे वनपरिक्षेत्राच्या वतीने दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली होती. त्याचे दोन वर्षे देखभाल करण्यात आले. ती झाडे ऑगस्ट २०२४ मध्ये लष्कराकडे वर्ग करण्यात आली. ही झाडे आता पाणी नसल्याने सुकली असली तरीही जंगली झाडे पावसाळ्यामध्ये पाणी मिळाल्यानंतर पुन्हा फुटून त्यांची वाढ होते. असे असले तरीही लवकरच वन विभागाच्या वतीने पाण्याचा टँकर उपलब्ध करून झाडांना पाणी देण्यात येईल.
– प्रज्ञा तावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी