कान्हे : ग्रुप ग्रामपंचायत कान्हे मधील येवलेवाडी गाव आजतागायत स्मशानभूमीविना आहे. येवलेवाडी गावाला स्मशानभूमी नसल्याने गावातील मृत नागरीकाचे अंत्यसंस्कार उघड्यावर करावे लागत आहेत. उन्हाळा असो की पावसाळा ग्रामस्थांना मृत व्यक्तीचे अंत्यविधी उघडल्यावर करावे लागतात. अशावेळी अंत्यविधीस आलेल्या पाहुणे मंडळी, नातेवाईक यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मरणानंतरही मृतदेहाला मरणयातना सहन कराव्या लागत असून ग्रामपंचायत व संबंधित प्रशासकीय विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गावाला स्मशानभूमी नाही. मात्र स्वतः ग्रामस्थही याबाबत पुढाकार घेताना दिसत नाही. सध्या जिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत, ती जागा वन विभागाच्या क्षेत्रात आहे. तर या जागे शेजारी खाजगी क्षेत्र आहे. यामुळे गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन व एक विचाराने स्मशानभूमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
स्मशानभूमी असावी पण दुसऱ्याच्या जागेत, या उक्तीप्रमाणे गावात कुणीही आपली जागा स्मशानभूमीला द्यायला तयार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर आपल्या जागेशेजारी स्मशानभूमी झाल्यास आपल्या जागेची किंमत कमी होईल, यामुळे कुणी स्मशानभूमीला जागा देऊ करीत असेल तर विरोध होत असल्याचे सत्यही ग्रामस्थांनी बोलून दाखविले. एकंदरीत जागा आणि पैशाच्या विचारात स्मशानभूमी अडकल्याचे दिसते.
अशी बदलली अंत्यसंस्काराची जागा
१९९८ साली येवलेवाडी ओढ्यालगत अंत्यसंस्कार
२०१० दौंडे कॉलनीजवळील ओढ्यालगत अंत्यसंस्कार
२०१५ ते २०२४ वनविभागाच्या क्षेत्रात अंत्यसंस्कार
स्मशानभूमीसह रस्त्याचीही समस्या
सध्या ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. एकीकडे उघड्यावर अंत्यसंस्कार दुसरीकडे अंत्यविधीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, अशी दुहेरी बिकट अवस्था आहे. पावसाळ्यात तर चिखल वाट तुडवित अंत्यविधीसाठी जावे लागत असल्याचे गावकरी सांगतात.
स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीकडे १५ लाखांचा निधी उपलब्ध आहे. परंतु जागेअभावी स्मशानभूमी होऊ शकत नाही. येवलेवाडी ग्रामस्थांनी यावर विचार करून एकविचाराने जागा उपलब्ध करून दिल्यास त्वरित स्मशानभूमीचे काम करता येईल.
– विजय सातकर, माजी सरपंच, कान्हे-नायगाव-येवलेवाडी