खालापूर : तालुक्यामधील माजगाव ग्रामपंचायत हद्दीतील पौद जल जीवन पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून जवळपास ठप्प आहे. ठेकेदाराच्या भोंगळ कारभाराबाबत ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार करूनही कोणताही ठोस उपाय न निघाल्याने येथील पाणी योजनेचे काम बंद असवस्थेत दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेत, महिला वर्गाच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार हर घर जल ध्येयाअंतर्गत गावोगावी प्रत्येक घरी नळ व त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याचा संकल्प असून पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. परंतु अनेक गावात पैसे/फंड मिळूनही पाणीपुरवठा योजना मार्गी लागलेल्या दिसत नाही, तर अनेक ठिकाणी योजनांचे काम अर्धवट आहेत किंवा बंद आहेत.
माजगाव ग्रामपंचायत हद्दीतील पौद येथील जल जीवन मिशनची पाणी पुरवठा योजना अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. येथील योजनेकरीता शासनाने २९ लाख ५० हजार १०६ रुपये निधी उपलब्ध करून दिला. यातील जवळपास ९ लाख निधी ठेकेदाराला अदा करण्यात आला आहे. परंतु सध्या योजनेचे काम ठप्प असून जल जीवनची टाकी उभारण्यासाठी लावलेले बांबू देखील कुजून गेले आहेत.
पौद येथील जल जीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरुवातीला संत गतीने सुरू होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे काम जवळपास बंद अवस्थेत आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार फोन केला असता तो प्रतिसाद देत नाही. तसेच, संबंधित विभागाला बंद असलेल्या कामाबाबत पत्रव्यवहार करून सर्व माहिती दिली आहे.
– संदीप धारणे, ग्रामसेवक