पिंपरी – लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात महानगरपालिका निवडणूक लढू इच्छिणार्यांची चढाओढ सुरू झाली आहे. गेली अनेक महिन्यांपासून अज्ञातवासात असलेले हे इच्छुक आता जागृत झाले असून, त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे दिसून आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयीन तिढा सुरू आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून राज्यभरातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक व पदाधिकार्यांचा कार्यकाळ 22 मार्च 2022 मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू आहे. दरम्यान, महानगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर व्हावी, अशी राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांसह नागरिकांची देखील मागणी आहे. शिवाय ही निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी मोठी तयारी केली आहे.
आजी- माजी नगरसेवकांसह अनेक तरुण कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्याची रंगीत तालीम देखील झालेली आहे.आजी-माजी नगरसेवकांनी त्यांचे प्रभाग निश्चित करून ठेवले आहेत. काहींनी नवीन प्रभाग हेरले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्याने येत्या दोन ते तीन महिन्यांत या निवडणुका होतील, अशी आस अनेकांना लागली आहे.
हे प्रमुख पक्ष असतील निवडणुकीच्या रिंगणात
महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे संख्याबळ मोठे होते. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्याने निवडणूक लढविणार्या प्रमुख पक्षांची संख्या अधिक राहणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेची ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.
नागरिकांशी नाळ जुळलेलीच; आता उजळणी
महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून आजी- माजी नगरसेवक आपल्या प्रभागात व्यस्त आहेत. कार्यकाळ संपला असला, तरी त्यांनी प्रभागातील नागरिकांशी नाळ जुळवून ठेवलेली आहे. गणेशोत्सव, नवरात्र, तसेच आताच्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ते नागरिकांशी संपर्कात राहिले. त्यात तरूण कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी आहे.आता या जनसंपर्काची उजळणी सुरू होणार असल्याचे चित्र आहे.