- दहा कोटींची औषधे, वैद्यकीय साहित्याची भांडार विभागाकडून खरेदी
- सर्व नियम धाब्यावर बसवत केवळ तीन दिवसांसाठी निविदा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने “कोविड’च्या नावाखाली सुरू केलेला खरेदीचा सपाटा कायम ठेवला आहे. आता सव्वाचार कोटींच्या ऍलोपॅथिक औषधांची तसेच सव्वासहा कोटींच्या सर्जिकल साहित्याची खरेदी केली जाणार आहे. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येत असलेल्या या निविदा प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन नियमानुसार किमान सात दिवसांची निविदा प्रसिद्ध करणे अपेक्षित असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ तीन दिवसांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने गेल्या पाच महिन्यात कोविडच्या नावाखाली केलेली बहुतांश खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ठराविक ठेकेदारांसाठी तयार करण्यात आलेल्या अटी-शर्ती, काही “जावई’ ठरलेल्या ठेकेदारांना देण्यात येणारे कोट्यवधींच्या खरेदीचे थेट आदेश तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा हवा तसा खरेदीसाठी केलेला गैरवापर यामुळे कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप सध्या भांडार विभागावर होत आहेत. पूर्वीच्या खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा धुरळा खाली बसण्याअगोदरच आता नव्याने साडेदहा कोटींच्या खरेदीची चुकीच्या पद्धतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
55 प्रकारची ऍलोपॅथिक औषधांची खरेदी केली जाणार असून त्यासाठी 4 कोटी 19 लाख 59 हजारांचा खर्च केला जाणार आहे. तसेच 81 प्रकारचे सर्जिकल साहित्य खरेदी केले जाणार असून त्यापोटी 6 कोटी 29 लाख 43 हजारांचा खर्च केला जाणार आहे. ही निविदा प्रसिद्ध करताना सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ तीन दिवसांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासन नियमानुसार किमान सात दिवसांची निविदा प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे. तर या निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती काही ठराविक पुरवठादारांना डोळ्यासमोर ठेवून टाकण्यात आल्या आहेत. सध्या कोविडकाळात ठराविक ठेकेदारांचे हित कशा पद्धतीने साधले जाते, त्याचा ही निविदा एक उदाहरण असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. चुकीच्या पद्धतीने तसेच शासकीय नियमांची तोडफोड करून सादर करण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून शासन नियमानुसार नव्याने निविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी होत आहे.
साहित्य जाते तरी कोठे?
नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या औषधे आणि सर्जिकल साहित्यासाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेली आहे. कोट्यवधींचे साहित्य खरेदी केल्यानंतर हे साहित्य नेमके जाते तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरवठा, वापर आणि गरज याचा ताळमेळ कोणीच ठेवत नसल्याने या साहित्यामध्ये मोठा गैरप्रकार सुरू असल्याचीच शंका अनेकजण व्यक्त करत आहेत
रेमेडिसवीर गायब?
महापालिकेने गेल्या महिन्यात कोट्यवधी रुपयांच्या रेमेडिसवीर इंजेक्शनची खरेदी केली होती. महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रेमेडिसवीर इंजेक्शनसह महागडी औषधे बाहेरूनच विकत घेण्यास सांगितली जात आहेत. रुग्णांचे नातेवाईक हजारो रुपये खर्च करून इंजेक्शन बाहेरून आणत असतील तर महापालिकेने खरेदी केलेल्या इंजेक्शनचे काय झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.