पिंपरी : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी (दि. ५) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासानुसार आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देहूगावात शोककळा पसरली आहे.
शिरीष महाराज यांनी अलिकडेच नवीन घर बांधले होते. त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर आई-वडील राहत होते, तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, आज सकाळी ८:३० वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. घरच्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जबरदस्तीने दार तोडून पाहिले असता, त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिरीष महाराज मोरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते. ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत होते. शिरीष महाराज मोरे यांचा विवाह होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा टिळा पार पडला होता.
शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे. पोलिसांनी या पत्रांचा तपशील गोळा केला असून, प्राथमिक तपास सुरू आहे. मोबाइलचा डेटा संपूर्णपणे फॉरमॅट करण्यात आला असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे करत आहेत.
माफी मागून संपविले आयुष्य
शिरीष महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. एक चिठ्ठी आई-वडील आणि बहिणीला उद्देशून लिहिली आहे. यात आयुष्यात जे काही मिळाले ते तुमच्या पाठिंब्यामुळे मिळाले असल्याचे म्हणत आभार मानले आहेत. तसेच आयुष्यात कधीच तुम्हाला माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही, एवढ सुंदर जगलो. कधी-कधी सर्व मिळवून सुद्धा माणूस हारतोच. मी ही थांबत आहे, याचा सर्वस्वी दोष माझाच आहे मला माफ करा, असे म्हटले आहे. दुसरे पत्र आपल्या मित्रांना संबोधून लिहिले आहे. यात म्हटले आहे की, युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चूकच. आई-वडिलांना सांभाळा, दिदीचे चांगले स्थळ पाहून लग्न लावून द्या. खूप मोठा कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे, तेवढा आई-वडिलांच्या डोक्यावरुन उतरवा असे म्हटले असून कुणाचे किती देणे आहे ते देखील नमूद केले आहे. गाडी विकण्याची तसेच थोडे-थोडे पैसे जमा करुन कर्ज फेडण्याची विनंती केली आहे. तसेच आपल्या होणाऱ्या पत्नीचे लग्न लावून देण्याची विनंती केली आहे. होणाऱ्या पत्नीला संबोधित करुन लिहिलल्या पत्रात शिरीष महाराज यांनी तुझाच सर्वांत मोठा अपराधी असल्याचे म्हटले आहे तसेच अनेक बाबी अर्धवट राहिल्या असल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच निस्वार्थ भावनेने दिलेल्या साथीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पत्राच्या शेवटी पुढे जा… खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट आता वर्क फ्राॅम होम घे. खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या आहेत, मला माफ कर… असे म्हटले आहे.