पिंपरी : महापालिकेच्या काही शाळांमध्ये डिसेंबरपर्यंत नवनीत पब्लिकेशन्सची गणित विषयाची पुस्तके वाटप करणे बाकी होते. या बाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रकरणी पर्यवेक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, तक्रारीनंतर ठेकेदाराने पुस्तकांचे त्वरित वाटप केले आहे. शिक्षण विभागाने विशाल एंटरप्रायझेस कंपनीला ‘डीबीटी’द्वारे थेट शालेय साहित्याचे काम दिले होते.
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४२ हजार आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या नऊ हजार अशा पहिली ते दहावी एकूण ५१ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दरवर्षी महापालिका ‘डीबीटी’ माध्यमातून शालेय साहित्य खरेदीसाठी अनुदान देत होती. यावर्षीदेखील महापालिकेने विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे थेट शालेय साहित्याचे रोख रक्कम देणे अपेक्षित होते. पण यावर्षी नवीन पद्धत वापरूनही शिक्षण विभागातील लिपिक आणि जुन्या ठेकेदारांना डीबीटी’चे काम मिळाले. विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा न करता क्युअर कोडव्दारे साहित्य दिले गेले.
२८ डिसेंबर रोजी विशाल एंटरप्रायजेसबाबत तक्रार प्राप्त झाली. ३० डिसेंबर रोजी शिक्षण अधिकारी थोरात यांनी पर्यवेक्षक यांना कार्यालयीन आदेश काढून साहित्य पुरवठा अहवाल करण्याचे आदेश दिले. १० जानेवारी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय थोरात यांनी अहवाल करण्याचे आदेश दिले आहे, असे सांगितले. पण पर्यवेक्षकांकडून शिक्षण विभागात एका जागी बसून अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पाहण्यात आले. म्हणूनच डिसेंबर अखेरपर्यंत पुरवठा न करणाऱ्या या ठेकेदाराला आदेश निघून कोणतेही कारवाई होत नसल्याचे पाहण्यात आले.
महापालिका शिक्षण विभागाकडे विशाल एंटरप्रायजेसबाबत तक्रार दाखल झाली आहे. साहित्य पुरवठाबाबत पर्यवेक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अहवाल करण्यात येईल. ’
– विजय थोरात, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग, महापालिका