पिंपरी : मुकाई चौक, किवळे परिसरातील साई ओरा सोसायटीच्या बाजूला सध्या अनेक झोपड्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेने येथील झोपड्यांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी आसपाच्या राहिवाश्यांनी केली आहे.
शहरातील झोपडपट्टी भागात नेहमीच गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यातच मुकाई चौक, किवळे भागात साई ओरा सोसायटीच्या जवळ लेबर कॅम्प आणि नव्याने झोपडपट्टी निर्माण होत आहे. आधीच या भागातील रस्ते अर्धवट आहेत. विजेची समस्या कायम आहे.
वाढत्या झोपडपट्टीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या भागातील भुरट्या चोर्या वाढल्या आहेत. याबाबत आसपासच्या विविध सोसायट्यांमधील नागरिकांनी एकत्र येत या झोपड्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.
मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. जर महापालिकेने या झोपड्यांवर कारवाई केली नाही तर येथील सर्व सोसायट्या एकत्र येऊन आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.