- मुदत संपण्यापूर्वी 280 कोटींच्या कामांना मंजुरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांच्यासह काही सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपणार आहे. तत्पूर्वी आज स्थायी समितीची स्पेशल बैठक घेण्यात आली. या विशेष बैठकीत विकासकामांना मान्यता देत कोटींची उड्डाणे घेतली आहेत. त्यामध्ये रस्ते विकास कामांसह तब्बल 280 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली आहे.
सभापती संतोष लोंढे स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. वाकड रस्ते विकसित करण्याकामी 42 लाख रुपये, पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी परिसर आणि चऱ्होली परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 95 लाख, रहाटणी परिसरातील रस्त्यांवरील दिवाबत्ती पोल बदलण्यासाठी 92 लाख, चापेकर चौक ते मोरे हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता अर्बन डिझाईन नुसार विकसित करण्यात येणार असून यासाठी 5 कोटी 82 लाख, भोसरी स्मशानभूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता तसेच भोसरीमधील बापूजीबुवा चौक ते पीएमटी चौकापर्यंतचा रस्ता आणि प्रभाग क्रमांक 8 मधील यशवंतराव चव्हाण चौक ते विश्वश्वेर चौकापर्यंतचा रस्ता अद्यावत करण्यात येणार आहे. यासाठी 77 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
बिर्ला हॉस्पिटल पासून वाल्हेकरवाडीपर्यंतचा रस्ता, दोन्ही बाजूंनी पदपथ, तसेच सायकल ट्रॅक करण्यासाठी 20 कोटी 55 लाख रुपये, भोसरीतील चांदणी चौक ते लांडेवाडी महाराष्ट्र बॅंकेपर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी 35 कोटी 97 लाख रुपये खर्च केले जातील. प्रभाग क्रमांक 8 मधील संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्स पर्यंतचा रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी 27 कोटी 62 लाख रुपये खर्च होणार आहेत. यासह विविध 280 कोटी 18 लाख 44 हजार 299 रुपयांच्या विकासकामांना स्थायी समितीने मान्यता दिली.