पिंपरी : बावधनमधील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मध्यरात्री उशिरा प्राप्त झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर हा मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री आयुक्तालयाला बावधन येथील एका शाळेत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा अज्ञात व्यक्तीकडून ई-मेल प्राप्त झाला. घटनेची गंभीर दखल घेत बीडीडीएस पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पोलिसांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. यापूर्वीही असे मेल अनेकदा प्राप्त झाले आहेत. पोलीस अशाबाबतीत सतर्क असून सर्व तपासणी करण्यात येते. फेक मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलकडून प्रयत्न सुरू आहेत.