कान्हे : मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील येवलेवाडी रोडच्या लगत गावठी दारू सर्रासपणे विक्री चालू आहे. या व्यवसायाचा येवलेवाडी येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
येवले वाडी रस्त्यावर संध्याकाळी व सकाळच्या वेळी दारुच्या नशेत मद्यपी मोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत असतात. यामुळे परिसरातील शांतता बिघडली असून सातत्याने भितीचे वातावरण असते. यापूर्वीही पोलिसांनी अशा अवैध गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र काही काळानंतर दारु विक्री पुन्हा सुरू होते.
अशा गावठी दारु धंद्यामुळे येवलेवाडी गावचे नाव बदनाम होत आहे असे धंदे गावात नसावे मात्र अशा लोकांच्या तोंडाला कोण लागणार? असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. गावठी दारु विक्रेत्यांच्या विरोधात प्रतिष्ठित नागरिक जात नसल्याचा फायदा गावठी दारू विक्रेते घेत आहे. कुसगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीट भट्टी कारखाने आहेत.
या शिवाय आसपासच्या परिसरातील कामगार वर्ग देखील येथे स्वस्त दारु मिळत असल्याने दारु पिण्यासाठी येतात. गावठी दारुच्या या धंद्यामुळे आमचे संसास रस्त्यावर येतील, अशी भीती कामगारांच्या कुटुंबातील महिला देखील व्यक्त करत आहेत. गावठी दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी कुसगाव येवलेवाडी येथील ग्रामस्थ करत आहेत.