पिंपरी – थरमॅक्स चौकाजवळील साई सावली या बंगल्यात आगाची घटना घडली. यात जिन्याजवळ लागलेल्या आगीमुळे चारजण अडकले होते. मात्र या चौघांची सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केली आहे.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 3) सकाळी 7.05 वाजता सविता माळी यांनी अग्निशामक दलास कस्तुरी मार्केट थरमॅक्स चौकाजवळील साई सावली येथे पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पार्किंगमधील जिन्यात आग लागल्याचे दिसून आले.
तसेच साई सावली बंगल्याचा मेन गेट व जिना या दोन्ही ठिकाणी आतून कुलूप लावल्याचे दिसून आले. या बंगल्यात चार व्यक्ती अडकल्या होत्या. मात्र जिन्याला कुलूप असल्याने त्या व्यक्ती आगीमुळे बाहेर येऊ शकत नव्हत्या. अग्निशामक दलाने मुख्य प्रवेशद्वार व जिन्याच्या गेटचे कुलूप कटरच्या साहायाने तोडून आत प्रवेश केला.
तर जिन्याजवळील मीटर बॉक्स, रद्दी आणि खूर्चीला आग लागल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाने वीज पुरवठा खंडीत करीत आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच बंगल्यात अडकलेल्या सुरज झगडे, वर्षा झगडे, श्रद्धा माळी व कुमार माळी यांची सुटका करण्यात आली.
ही कामगिरी उप अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, संजय महाडिक, राजेश साकळे, अनिल माने, ट्रेनी फायरमन सालि देवगडकर, निरंजन लोखंडे, सौरव धोरपडे, तेजस पवार या जवानांनी केली.