पिंपरी : निगडी प्राधिकरणात विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांची खोदाई केल्यानंतर कंत्राटदारांकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण होत असून वाहनचालक, पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्ती काम तातडीने हाती घेऊन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात दानवले यांनी म्हटले आहे की, निगडी प्राधिकरणात जलवाहिनी टाकणे, जलनिःसारण नलिका टाकणे, गॅस वाहिन्या, केबल टाकणे यासह स्मार्ट सिटीची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई केली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहनचालक तसेच पादचारी नागरिक हैराण झाले आहेत.
खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, वाहन चालक व निगडी प्राधिकरण येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. निगडी प्राधिकरणातील सेक्टर २७, सेक्टर २६ दुर्गेश्वर मार्ग ते परमार पार्क रस्त्यापर्यंत व तसेच सेक्टर २४, २५, एलआयजी मधील २६, २७, २८, निगडीतील दुर्गा मंदिर, साई मंदिर परिसरातील अंतर्गत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे.
त्याचबरोबर सर्व सेक्टर भागातील अंतर्गत रस्ते देखील डांबराचे करण्यात यावेत. अन्यथा आपल्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दानवले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदना देताना मनसेचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष भागवत नागपुरे उपस्थित होते.