पिंपरी : ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात-बारावरील इ-करार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता घरबसल्या ऑनलाइन महसूल संदर्भातील कामे करता येणार आहेत.
महसूल विषयक कामे करण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालात जावे लागते. मात्र, त्या ठिकाणी अनेकदा तलाठी नसल्याने नागरिकांना कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. तसेच अनेक तलाठ्यांना इतर कार्यालयांचा (सज्जा) कार्यभार असते. त्यामुळे तलाठी आठवड्यातील वार ठरवून कार्यालयात उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबतात. त्याचबरोबर तलाठी कार्यालयात खाबुगिरीसाठी नागरिकांचे कामे रखवडली जातात.
त्या पाश्वभुमीवर शासनाने महसूल कामाला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली असून अनेक तलाठी कार्यालयातील अनेक कामे ऑनलाइन करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांकडून या ऑनलाइन प्रणालीचा वापर पाहिजे तेवढा करण्यात येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
असे करा ऑनलाइन अर्ज
ई-हक्क प्रणालीमधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई-फेरफार मध्ये घेऊन फेरफारमध्ये रुपांतरीत करता येणार आहेत. ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रणालीच्या https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिक, सहकारी संस्था यांना वापरकर्ता नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर लॉगिन करून अर्जदारांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, इकरार नोंदी, मयताचे नावे कमी करणे, अपाक कमी करणे, एक्युमॅ नाव कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे, कलम १५५ बाबतचे अर्ज सादर करता येणार आहेत.
या प्रणालीवर नागरीक, सहकारी संस्था ऑनलाइन प्रणालीद्वारे घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून ग्राममहसूल अधिकाऱ्यांकडे पाठवू शकतात. त्यासाठी ग्राममहसूल अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. यामध्ये नागरिक स्वतः अथवा महा ई-सेवा केंद्रातून देखील अर्ज करु शकतात. या प्रणालीच्या वापराने ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडील फेरफार घेण्याचे कामकाज सुलभ होणार आहे. महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता व पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यापुढे वरील नोंदींचे अर्ज ई-हक्क प्रणाली मधूनच करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
ई-हक्क प्रणालीचा वापर करुन आठ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येतात. त्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता आण्यासाठी ही पब्लिक डाटा एन्ट्री प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा.
– जयराज देशमुख, अपर तहसीलदार, पिंपरी चिंचवड