वडगाव मावळ : धुलिवंदनच्या दिवशी वडगाव मावळ येथे झालेल्या दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी ३२१ बैठका मारून गतवर्षी सौरभ ढोरे याने केलेला २८५ बैठकांचा विक्रम मोडून नवा विक्रम केला.
दरम्यान कुमार गटात विराज वाघवले याने ३०१ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावला तर तेजस भिलारे याने १०१ बैठका मारून वरिष्ठ गटात दुसरा क्रमांक पटकावला. तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, विश्वस्त गणेशअप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, तुकाराम ढोरे, क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, बापूसाहेब वाघवले, पोलीस निरीक्षक कुमार कदम, अतिश ढोरे, उमेश ढोरे आदींच्या हस्ते शिवप्रतीमा पूजन व गोटी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी, बाळासाहेब ढोरे, बाबुराव वायकर, विठ्ठलराव भोसले, पंढरीनाथ ढोरे, मनोज ढोरे, राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, अविनाश चव्हाण उपस्थित होते.
याप्रसंगी, कुमार गटात देवेश पाटील याने ६१ बैठका मारून विराज ढोरे याने ५१ बैठक मारून तिसरा क्रमांक पटकावला. यशराज चव्हाण याने ५० बैठका, तुषार नवघणे याने ५० बैठका, यश ओझरकर याने ३७ बैठका, विनीत वहिले याने ३५ बैठका मारल्या. वरिष्ठ गटात पांडुरंग नवघणे याने ३३ बैठका मारून तिसरा क्रमांक पटकावला तर आदित्य आगळमे याने ३२ बैठका मारल्या. याशिवाय मदन भिलारे व सचिन ढोरे यांनी गोटी हातावर धरून अनोखा प्रयत्न केला.
विक्रमांची हॅट्ट्रिक
शिवछत्रपती पुरस्कार विजेते व क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले नितीन म्हाळसकर यांनी यापूर्वी एकदा १२७ बैठका मारून तर दुसऱ्यांदा १८० बैठका मारून विक्रम केला होता. आज वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी तब्बल ३२१ बैठका मारून तिसऱ्यांदा विक्रम केला आहे.
चांदीची गदा, चांदीचे कडे अन् रोख बक्षीसे !
जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने दिवंगत पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट खेळाडूस चांदीची गदा, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने चांदीचे कडे व राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, विनायक लोकरे, किरण म्हाळसकर यांच्यासह उपस्थितांनी इनाम म्हणून रोख बक्षीस दिले. तसेच कुमार व वरिष्ठ गटातील विजेत्यांना अनुक्रमे अरुण वाघमारे, सुनील दंडेल, अशोक घुले, विकी म्हाळसकर, अमित मुसळे, अतुल ढोरे यांच्या वतीने चषक देण्यात आले, शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध बक्षिसे देण्यात आली.
पृथ्वीराज मोहोळसह नामवंत कुस्तीगीरांचा सन्मान
जय बजरंग तालीमच्या वतीने पृथ्वीराज मोहोळ यांच्यासह कुस्तीगीर पैलवान चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, तानाजी काळोखे, राजाराम पाटील, केतन घारे, भक्ती जांभूळकर यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुनील चव्हाण व विकी म्हाळसकर यांनी केले.