वडगाव मावळ : मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील मसूर, वाटाणा पिकाच्या काढण्या सुरू झाल्या आहेत. सोबत रब्बी गव्हाचे पीक देखील अतिशय जोमात आले असून शेतकरी वर्ग आनंदात आहे.
मावळ हा अतिपावसामुळे खरीप भात पिकासाठी ओळख असलेला तालुका असला तरीही मावळात रब्बीचे क्षेत्रही जवळपास पाच हजार हेक्टर इतके आहे. जितकी मागणी मावळातील सुवासिक इंद्रायणी तांदळाला आहे, तितकीच येथील रब्बी पिकांनाही असते.
मावळ तालुक्यात खरीप भात पिकाच्या काढणीनंतर भात खाचरांमध्ये रब्बी पिकांची पेरणी केली जाते. यात गहू, हरभरा, मसूर, वाटाणा ही पिके घेतली जातात. काही ठिकाणी शेतकरी कांदा पिकाचीही लागवड करीत आहेत. गतवर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामासाठी पुरेपूर पाणीसाठा आणि पोषक वातावरण आहे. यामुळे पिके चांगली बहरात आहेत.
मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात काढणी झाल्यावर शेतकऱ्यांनी वाटाणा व मसूर यासारखी पिके घेतली. ही दोन्ही पिके आता जवळपास काढणीला आली असून शेतकरी खाचरात वाटाणा, मसूर काढणी करताना दिसत आहेत. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी भात खाचरांमध्ये घेतलेले रब्बी गव्हाचे पिकही चांगले बहरले असून पीक वाढीस लागले आहे.
चारशे हेक्टर क्षेत्रात गव्हाचे उत्पादन
मावळ तालुक्यात रब्बी पिकांसाठी म्हणजेच ज्वारी, गहू, हरभरा, मसूर, वाटाणा यासाठी अनुकूल वातावरण असल्याने सर्व ठिकाणी पिकांची अवस्था चांगली असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. तसेच, रब्बी हंगामातील एकूण क्षेत्रापैकी गहू पिकाचे क्षेत्र सुमारे ४०० हेक्टर इतके आहे. तर, ज्वारीचे ७०० हेक्टर क्षेत्र, ४४० हेक्टर हे हरभरा व मसूर यांचे क्षेत्र आहे, अशीही माहिती पडवळ यांनी दिली.