पबजी गेमची वाढती ‘क्रेझ’ ठरतेय घातक

मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम; एकलकोंडेपणात वाढ


-दीपेश सुराणा

पिंपरी – पबजी या ऑनलाइन खेळात मग्न झाल्याने त्या खेळातील शत्रू सैनिक जणू आपल्याला बंदूक घेऊन मारायला येत आहेत, असा भास होऊ लागल्याने थेरगाव येथील 12 वर्षीय मुलाला खासगी रूग्णालयात दाखल करण्याची नुकतीच वेळ आली होती. संबंधित मुलगा आता उपचारानंतर बरा झाला आहे. मात्र, ही घटना खूप बोलकी आहे. पबजी या खेळाची वाढती क्रेझ आणि मुलांच्या आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम त्यातून समोर येत आहे.

थेरगावमधील या घटनेत संबंधित मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर देखील तो सातत्याने पबजी या खेळाबद्दल पालकांना विचारणा करीत होता. त्यामुळे त्यातून आलेल्या तणावातून संबंधित मुलाच्या वडिलांना देखील रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. पबजी या मोबाईलवरील ऑनलाइन खेळाने तरुण आणि मुलांना चांगलीच भुरळ पाडली आहे. तासनतास भान हरपून हा खेळ खेळला जात आहे. पर्यायाने मुलांच्या एकलकोंडेपणात वाढ होत आहे. जागरण करून हा खेळ खेळण्यावर मुलांचा भर असतो. त्यामुळे मुलांना रात्रीची अपुरी झोप मिळते, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञांनी दिली.

पबजी याचा अर्थ प्लेयर अननोन बॅटल ग्राउंडस. हा खेळ अँड्राइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध आहे. शिवाय, त्याचे डेस्कटॉप व्हर्जनही मिळते. सध्या मोबाईल डेटा अतिशय स्वस्त झाला आहे. मोबाईलवर सहजगत्या हा खेळ मिळत असल्याने एकट्याने, दोघांनी किंवा चौघांनी मिळून तो खेळला जातो. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या ऍक्‍शन हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.

“”मुले आणि तरुण पबजीसारख्या खेळात आभासी जगच वास्तव समजून अतिशय मग्न होऊन जातात. या खेळाच्या अति आहारी जाण्याने अभ्यासातील लक्ष उडणे, एकटेपणा, चिडचिडेपणा यामध्ये वाढ होते. मुलांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी संबंधित खेळातील पोकळता पालकांनी लक्षात आणून देणे गरजेचे आहे. त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करावे.”
– डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचारतज्ज्ञ

घटना –

3 एप्रिल – पबजी खेळण्यावरून आई रागावल्याने हैदराबाद येथील दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने केली आत्महत्या
17 मार्च -हिंगोली येथील खटकाळी बायपास भागातील रेल्वे रुळांवर बसून पबजी गेम खेळणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू

मुलांवर होणारे परिणाम

-खेळातील हिंसकतेचा मुलांच्या मानसिक स्थितीवर विपरित परिणाम
-सतत ऑनलाइन राहण्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याचा धोका
-अस्वस्थता, रात्रीचे जाग्रण, एकाग्रतेचा अभाव
-अभ्यासापासुन मन विचलित होण्याचे प्रमाण जास्त
-आभासी जग खरे मानल्याने वर्तणुकीत बदल

काय घ्याल काळजी

-पालकांचा हवा मुलांशी सुसंवाद
-मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे आवश्‍यक
-मोबाईलच्या वापराबाबत ठरवावी वेळ मर्यादा
-वर्तणुकीत बदल आढळल्यास समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांचे घ्यावे मार्गदर्शन

केस स्टडी – पिंपरी येथील 14 वर्षीय मुलगा. पबजी खेळाच्या अति आहारी गेल्याने मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. तो 7 ते 8 महिन्यांपासून मोबाईलवर पबजी गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा वाढला होता. स्वभावातील आक्रमकता वाढली होती. शाळेत देखील तो दप्तरामध्ये लपवुन मोबाईल नेत होता. फावल्या वेळेत हा खेळ खेळत असे. मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपचाराने तो बरा झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.