पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक तसेच दुकानाच्या बाहेर दुकाने मांडलेल्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली.
मावळ भागातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. तर वातावरणातील उकाडा वाढला आहे. शुक्रवारी सकाळपासून पिंपरी-चिंचवड शहर, मावळ परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ढग अंधारून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.
गेली तीन दिवसांपासून शहरातील वातावरण ढगाळ राहून, विजेच्या कडकडाटासह अवकाळी हजेरी लावण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. मात्र दोन दिवस उशिराने अवकाळीने शहर व परिसरात हजेरी लावली. त्यामुळे शहरातील बहुतांशी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर बच्चे कंपनीने या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.