खालापूर : केळवली गावातील पाणी पुरवठा योजनेचे बिल थकीत राहिल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने या गावचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात बंद आहे. ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत ग्रामपंचायत कार्यालयात जात प्रशासनाला जाब विचारला. गेली आठवडाभरापासून पाणीपुरवठा बंद असल्याचे चित्र आहे.
तापमानाचा पारा वाढू लागली असून धरणातील पाणीसाठ्याची पातळी हळुहळू खालावू लागल्याने पाणी टंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. असे असताना गेल्या पाच सहा दिवसापासून खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील केळवली गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महिला व ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा परिस्थितीने केळवलीचे नागरिक हवालदिल झाले असून ग्रामस्थ हे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करीत आहे.
ही समस्या सुटावी यासाठी केळवली गावातील ग्रामस्थ सुनील दिसले, वैभव दिसले शरद दिसले, अक्षय दिसले, अंकुश मराठे, समाधान दिसले, जयेश कर्णूक, चेतन दिसले, प्रशांत दिसले, अमोल दिसले, कल्पेश दिसले यांनी ग्राम विकास अधिकारी महेश म्हसे यांची भेट घेत आपली व्यथा मांडत टंचाईची समस्या दूर करा अशी मागणी केली.
एक लाखापेक्षा अधिक थकबाकी
बीडखुर्द पंचक्रोशीत केळवली हे गाव मुबलक पाणी पुरवठासाठी ओळख होती, परंतु ऐन उन्हाळ्यात महावितरण ने थकीत बिलामुळे वीपुरवठा खंडित केल्याने केळवली गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तर एक लाख रुपयांहून अधिक बिल थकीत राहिल्याने केलेली गावावर नामुष्की ओढवली आहे.