पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला. कझाकिस्तान येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत राम गोमारे यांनी 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावत ही स्पर्धा 11 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केली. संपूर्ण स्पर्धेत केवळ 16 मिनिटांची विश्रांती घेऊन त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कझाकिस्तान मधील नूर सुलतान शहरात 14 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा पार पडली. इशीम नदीच्या थंडगार पाण्यात 3.8 किलोमीटर अंतर पोहून त्यांनी एक तास 36 मिनिटांमध्ये पूर्ण केले. स्पर्धेबाबत बोलताना ते म्हणाले, पाण्यात उडी मारली अन 200 मीटर अंतर कापताच श्वास घेताना त्रास होऊ लागला. श्वास कमी पडू लागला. स्पर्धेचं मनावर ओझं वाटू लागलं. हात वर करून पाण्यातून बाहेर पडावं वाटत होतं. पण तरीही स्वतःच स्वतःला समजावत स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत हे अंतर पूर्ण केलं.
त्यानंतर 10.9 मिनिटांमध्ये लगेच 180 किलोमीटर सायकलिंगला सुरुवात केली. एकही खड्डा, गतिरोधक नसलेल्या आयर्नमॅन ही स्पर्धा तीन प्रकारात घेतली जाते. तिलाच ट्रायलथॉन असेही म्हणतात. 3.8 किलोमीटर अंतर पोहून 2 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे असते. त्यानंतर लगेच 180 किलोमीटर सायकलिंग करायची असते. त्यासाठी 8 तास 10 मिनिटे एवढा वेळ असतो. नंतर 42.2 किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेतली जाते. धावण्यासाठी 6 तास 30 मिनिटे एवढा अवधी असतो. एकापाठोपाठ एक तिन्ही स्पर्धा 17 तासांच्या कालावधीत पूर्ण कराव्या लागतात. सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी या तिन्ही स्पर्धा 11 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केल्या आहेत.
रस्त्यावरून माझी धन्नो (सायकल) सुसाट पळायला लागली. पण 15 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर शहर संपले आणि उघडा रस्ता लागला. वारा सायकलवर थेट आदळू लागल्याने अडथळे आले. तीन टप्प्याचे नियोजन करून एकदाही खाली न उतरता 180 किलोमीटर अंतर 5.42 तासात पूर्ण केले. सायकलिंग पूर्ण होताच धन्नोला स्टॅन्डवर लावली आणि तिने दिलेल्या साथीबद्दल तिला मिठी मारली, अशा शब्दात गोमारे यांनी आपल्या सायकलबद्दल भावना व्यक्त केल्या. अवघ्या साडेसहा मिनिटांत भर दुपारी दोन वाजता 42 किलोमीटर अंतर धावण्याची स्पर्धा सुरू झाली. यातही चार टप्पे करून ही स्पर्धा 4.15 तासात त्यांनी पूर्ण केली.
प्रेरणा एका आयर्नमॅनची
ट्रायथलॉन प्रवासाची सुरुवात पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांच्याकडून मिळाली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयर्नमॅन होण्याचे स्वप्न साकार करता आले, अशा भावना सहाय्यक पोलीस निरीक्षक आयर्नमॅन राम गोमारे यांनी व्यक्त केल्या. कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, श्रीकांत डिसले, कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक मंगश चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, बाळकृष्ण सावंत, रामदास इंगवले, कोच वैभव ठोंबरे, नितेश कुलकर्णी यांचेही सहकार्य मिळाले असल्याचे गोमारे सांगतात.