पिंपरी : सुरक्षारक्षकाकडून मारहाण प्रकरणाला वेगळे वळण

पोलिसांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप

पिंपरी -पिंपळे सौदागर येथील एमएससीबीच्या सुरक्षा रक्षकाने नागरिकाला मारहाण केल्याचा गुन्हा शनिवारी (दि.23) दाखल करण्यात आला होता. मात्र याप्रकरणाला वेगळे वळण लागले असून यामध्ये आरोपी असलेल्या सुरक्षा रक्षकाने थेट पोलिसांवर प्रकरण दाबण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. याचे निवेदन पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांना देण्यात आले असून त्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत.

पिंपळे सौदागर येथील विद्यूत महावितरण महामंडळ (एमएसईबी) येथील सुरक्षा रक्षक अशोक शिंदे या सुरक्षा रक्षकाने त्याची दोन मुले व त्यांच्या साथीदाराकरवी प्रशांत झिंजुर्डे यांना मारहाण केली होती. त्यानुसार प्रशांत यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सांगवी पोलिसांनी अशोक शिंदेला अटक केली व न्यायालयासमोर हजर करुन त्याची जामिनावर सुटका झाली.

त्यानंतर शिंदे हे थेट पोलीस आयुक्तांकडे गेले व त्यांनी तक्रारीचे निवेदन दिले. त्यामध्ये प्रकरण दाबण्यासाठी पिंपळे सौदागर येथील पोलीस कर्मचारी बोकड यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली, त्यातील 10 हजार रुपये दिले, मात्र पोलिसांनी ते पैसे परत केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. पाटील यांनी शिंदे यांना पोलीस चौकीत बोलावून झिंजुर्डे यांची माफी मागण्यास सांगितली, असे आरोपी निवेदनात म्हटले आहे.

त्यानुसार पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सांगवीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्याबाबत कारवाई करण्याच आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.