PCMC : लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांमधील वाद शमणार का ?

शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. नेते आणि प्रशासकीय अधिकारी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकताना आणि एकमेकांना थेट पोलीस ठाण्यापर्यंत खेचताना दिसत आहेत. शहराच्या विकासासाठी राजकीय आणि प्रशासकीय मंडळींनी एकमेकांना सहकार्य करणे अतिशय गरजेचे असते. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अधिकारी, कर्मचारी विरुद्ध नेतेमंडळी असे दृश्‍य पहायला मिळत आहे. ज्या शहराने दिलीप बंड, डॉ. श्रीकर परदेशी अशा खमक्‍या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाहिला आहे, त्याच शहरात सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चिखलफेक होत आहे. अधिकारी आणि नगरसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत. हे प्रकार शहरासाठी चिंतेचे ठरत असून नागरिकांच्या समोर आता प्रश्‍न उपस्थित होत आहे की लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांमधील वाद शमणार का?

महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बदनामी करण्यासाठी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु या प्रकारांमुळे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींची दुखरी बाजू आणि महपालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची प्रशासनावरील कमी होत असलेला वचक समोर आल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आयुक्‍तांनी अशा घटना रोखण्यासाठी ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, आपली कामे होत नसल्याची विरोधकांची सातत्याने ओरड होत आहे. राष्ट्रवादीच्या काळातही विरोधकांच्या अशाच तक्रारी होत्या. सारथीवरील नागरिकांच्या तक्रारीदेखील फारशा गांभिर्याने घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे. याच महापालिकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक असलेले आयुक्‍त पाहिले आहेत.

आयुक्‍त दिलीप बंड, डॉ. श्रीकर परदेशी यांचा नामोल्लेख आवर्जून करावा लागेल. बंड यांचे थेट अजित पवारांशी संबंध असल्याने, महापालिकेत एकहाती सत्ता असूनही राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना एखाद्या विकासकामाला किंवा अतिक्रमणविरोधी कारवायांना विरोध करण्याची हिंमत होत नसे. डॉ. श्रीकर परदेशी यांनी तर वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला लगाम घातला होता. त्यानंतर आलेल्या आयुक्‍तांनी मात्र सत्ताधाऱ्यांशी जुळते घेतल्याने डॉ. परदेशी यांच्या बदलीनंतर आजपर्यंत महापालिकेत शिस्तीची घडी पुन्हा बसू शकली नाही आणि शहराला खमक्‍या आयुक्‍तांची उणीव भासत आहे.

चिखलीतील अनधिकृत बांधकामाला नोटीस बजावायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या संवेदनशील घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले. “क’ प्रभागाचे कार्यकारी अभियंता विठ्ठल महाडिक यांना तत्कालीन नगरसेवक सूरदास गायकवाड यांच्याकडून झालेली मारहाण तसेच उत्तम हिरवे यांनी देखील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची उदाहरणे आहेत. तसेच प्राध्यापक असलेले भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिवाळी दरम्यान सफाई कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचे प्रकरण मिटविण्यात आले होते.

प्रभागातील विकासकामे होत नसल्याची भावना असल्याने, स्थानिक नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने विरोधी नगरसेवक नाराज असतात. त्यातच कर्मचारी – अधिकाऱ्याकडून मिळालेली दुरुत्तरे खटके उडण्यास कारणीभूत ठरतात. विवादाचा सगळा दोष लोकप्रतिनिधींच्या माथी मारला जात असल्याचा आरोप देखील लोकप्रतिनिधी करत आहे. याचादेखील विचार होणे आवश्‍यक आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सद्‌वर्तनाबद्दल वारंवार परिपत्रके काढूनही असे प्रकार रोखण्यात प्रशासनाला यश येत नाही. यामध्ये सत्ताधारी पक्षाची पडद्याआडची भूमिका, आक्रमक विरोधी पक्ष आणि प्रशासन यांची सांगड घालणे आवश्‍यक आहे. याकरिता आयुक्‍तांनी खमकी भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील दरी वाढत जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब ई-गर्व्हनन्स राबविताना अडचणीची ठरत आहे, एवढे मात्र निश्‍चित.

Leave A Reply

Your email address will not be published.