पिंपरी: निवडणुकांचे “सारथ्य’ पार्थ पवारांच्या हाती

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी कार्यरत होऊन स्थिती हाताळणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022 मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवरील राष्ट्रवादीची संघटना कार्यरत झाली आहे. राष्ट्रवादीचे सारथ्य आतापर्यंत अजित पवार हे स्वत:च करत होते. मात्र, पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील कामाला लागले आहेत. त्यांच्याच हाती या निवडणुकीचे सारथ्य जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शहर पातळीवर युवकांसह ज्येष्ठांकडूनही पार्थ यांच्या नेतृत्वाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 2022 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 15 वर्षे महापालिकेवर एकहाती सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादीच्या अर्थात अजित पवारांच्या हातून 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाकडे गेली. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांचे खंदे समर्थक अथवा एकेकाळचे “चेले’ असलेल्यांनीच अजित पवारांना हा धक्का दिला. हा पराभव पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. केंद्र, राज्य आणि महापालिकेतूनही राष्ट्रवादी हद्दपार झाल्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून शहर पातळीवरील संघटनेमध्ये मळभ दाटले होते.

मात्र, वर्षभरापूर्वी राज्यामध्ये “महाविकास आघाडी’च्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेते सज्ज झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गटातटात विभागलेला हा पक्ष गेल्या काही दिवसांपासून एकत्र येऊ लागला आहे. आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह काही ज्येष्ठ नेते कामालाही लागल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या एकत्र आलेल्या नेत्यांची मोट बांधून महापालिकेची सत्ता काबिज करणे वाटते तितके सोपे नसल्यामुळे पवारांच्याच मार्गदर्शनाखाली महापालिकेची निवडणूक लढवावी, असा दबाव वाढू लागला होता. नव्या जुन्यांसोबतच ज्येष्ठ आणि युवकांना एकत्र आणण्यासाठी आता पार्थ पवारांनाच मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे.

पार्थ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी पाच लाखांहून अधिक मते घेतली होती. ही त्यांची जमेची बाजू विचारात घेतानाच दीड वर्षापूर्वी नवखे असलेल्या पार्थ यांना शहरातील युवकांचा पाठिंबाही मिळू लागला आहे. या सर्व बाबींचा विचार करून तसेच अजित पवारांचे चिरंजीव, शरद पवार यांचे नातू अशीही त्यांची ओळख असल्याने महापालिकेचे नेतृत्व त्यांच्याच हाती द्यावे यासाठी स्थानिक पातळीवरून दबाव वाढल्याने अजित पवारही पार्थ यांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यभर संदेश देण्याचा प्रयत्न
पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांची चांगलीच बदनामी केली होती. यानंतर पार्थ हे वर्षभर राजकारणापासून दूर राहिले होते. मध्यंतरी त्यांनी पक्षाच्या विचारांशी न जुळणारी भूमिकाही घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. या सर्व बाबी पुसून काढण्याबरोबरच पवारांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व आक्रमकपणे आणि यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेपेक्षा दुसरा कोणताच योग्य पर्याय नसल्याने पार्थ यांनाच पुढे केले जाण्याची खेळी राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे. तसेच महापालिकेत पार्थ यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाल्यास यातून पार्थ यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्याबरोबरच राज्यभरही सकारात्मक संदेश जाऊ शकतो.

गरज मवाळपणाची

पार्थ यांच्या नेतृत्वाबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि युवक संघटना सकारात्मक असली तरी त्यांना शहर पातळीवर मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पार्थ यांच्याबाबत अनेक गैरसमज निर्माण करण्यात विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळविले होते. पार्थ यांनी अत्यंत मवाळ भूमिका घेतानाच केवळ नेत्यांमध्येच नाही सामाजिक कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत मिसळावे लागणार आहे. राष्ट्रवादीमध्ये केवळ पक्ष’ हाच गट असा संदेश द्यावा लागणार आहे. भाजपाकडे असलेली ताकद पाहता पार्थ यांनी आत्तापासूनच योग्य पावले उचलल्यास अवघड काहीच ठरणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.