तहसील कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी होतेयं गर्दी
पिंपरी – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी सध्या पालकांची धावपळ सुरू आहे. आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात त्यासाठी आवश्यक दाखले घेण्यासाठी पालकांची गर्दी होत आहे. “आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्यानंतर आता अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी पालकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.
“आरटीई’ प्रवेशासाठी 4 एप्रिलला सोडत काढण्यात आली. त्यानंतर महापालिकेने आकुर्डी आणि पिंपरी येथे कागदपत्र तपासणीसाठी दोन केंद्र सुरू केले. या केंद्रांवर 6 ते 20 तारखेदरम्यान कागदपत्र पडताळणी करून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत 3 हजार 255 राखीव जागांवर 1 हजार 385 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले. टक्केवारीनुसार हे प्रमाण 42.54 टक्के इतके होते. त्यामुळे कागदपत्रे तपासणी आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी 29 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारा उत्पन्न दाखला 7 दिवसांत उपलब्ध करून दिला जात आहे. जातीच्या प्रमाणपत्रासाठी मात्र तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. दाखल्यांसाठी निश्चित केलेल्या मुदतीनुसार नागरिकांना हे दाखले उपलब्ध करून दिले जात आहे.
– प्रवीण ढमाले, नायब तहसीलदार, पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय.
1095 प्रवेश निश्चित
“आरटीई’च्या आकुर्डी केंद्रातंर्गत एकूण 2 हजार 169 जागांपैकी 1095 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. तर, 39 विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले आहेत. पिंपरी केंद्रातंर्गत 20 तारखेपर्यंत 1086 जागांपैकी 454 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहे. तर, 17 विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहे.